सासवड: जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्वच प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले असले, तरी या आदेशाला सासवड पोलिसांनी हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. सासवड पोलीस ठाण्यातील एक वजनदार आका चक्क एका जुगाराच्या अड्ड्यावर जुगार खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबतचे पुरावे ‘पुणे प्राईम न्यूज’च्या हाती व्हिडीओ स्वरुपात लागले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे. या गंभीर प्रकाराबाबत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख काय कारवाई करणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सासवड पोलिसांनी बिंगो-चक्री जुगाराच्या अड्ड्यावर 28 मार्चला छापा टाकला होता. याचा एक व्हिडिओ ‘पुणे प्राईम न्यूज’च्या हाती लागला होता. मात्र पोलिसांनी आरोपींना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर मोठ्या आर्थिक हितसंबंधापोटी मोकाट सोडून दिले. तसेच सदर ठिकाणी टीव्ही दुरुस्तीचे काम सुरु असल्याची नोंद पोलीस ठाण्यातील डायरीमध्ये करून तो विषय कायमचा मिटवला.
सासवड पोलीस ठाण्यात हा ‘वजनदार आका’ मागील तीन वर्षांपासून बीट अंमलदार म्हणून कार्यरत आहे. या बहाद्दराच्या कृपा आशीर्वादामुळे सासवड परिसरात अवैध धंदे राजरोसपणे सुरु आहेत. सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरु ठेवून त्याने एक प्रकारचा विजय “श्री” मिळविला आहे. या वजनदार आकाचा सासवड परिसरात चांगलाच दबदबा आहे. तसेच या महाशयांनी जुगार खेळण्याचा छंद जोपासला असून खुलेआम अवैध धंद्यांच्या ठिकाणी जाऊन जुगार खेळत आहेत. या आकाचा दुसरा कारनामाही समोर आला आहे. तो एका बिंगो-चक्री जुगाराच्या अड्ड्यावर चक्री खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, हा वजनदार पोलीस कर्मचारी बिंगो-चक्री जुगाराच्या अड्ड्यावर पैसे लावत आहे. तसेच त्याने एका मिनिटाच्या आत पैसेही जिंकले. तसेच अवैधरीत्या जिंकलेली माया त्याने खिशात घातली आणि लगेचच रफुचक्कर झाला. मात्र, या वजनदार महाशयांना जुगार खेळण्याचा मोठा अनुभव असल्याचे स्पष्ट दिसून येत आहेत. जर पोलिसच जुगार खेळत असतील, तर इतरांनी त्यांचा आदर्श काय घ्यायचा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे बंद करावेत म्हणून नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. मात्र, अवैध धंदे काही बंद झाले नाहीत. कारण हे अवैध धंदे पोलीस ठाण्यातील आका आणि बोका या दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्याच शुभआशीर्वादाने बिनधास्तपणे सुरु आहेत. कुंपणच शेत खात असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे सासवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर स्वच्छ प्रतिमा म्हणून ओळख असलेले पंकज देशमुख हे या दोन कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार? की त्या दोघांना अभय मिळणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.