उरुळी कांचन, (पुणे) : राज्य सरकारने नव्याने जाहिर केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’च्या वयोमर्यादेत 65 वर्षे करण्यात आली आहे. मात्र, 65 वर्षापुढील महिलांनाहि या योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याची माहिती पेठच्या नवनिर्वाचित सरपंच पल्लवी चौधरी यांनी दिली.
पेठ (ता. हवेली) ग्रामपंचायतीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’योजनेचा शुभारंभ सरपंच पल्लवी चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी चौधरी बोलत होत्या. शासन नियमानुसार 65 वर्षाच्या पुढील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याने आम्ही मुख्यमंत्र्याच्या बहिणी नाहीत का? असा प्रश्न महिला भगिनींकडून उपस्थित केला जात होता. यावेळी त्यांना उत्तर देताना चौधरी यांनी हि माहिती दिली.
शासनाने नव्याने लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत अल्प उत्पन्न कुटुंबातील महिलांना महिना दीड हजार रुपये इतके अनुदान प्राप्त होणार आहे. आजच्या महागाईच्या काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणे अत्यंत जिकिरीचे ठरत असल्याने 65 वर्षापुढील महिलांनाहि याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.
65 वर्षापर्यंत सर्वच बाजूने काही ना काही काम करून काही महिला प्रपंच चालवत असतात व खरी आधाराची गरज त्यांना असते. उतारवयात काम करण्याचे बंद झाल्यावर त्यांना या योजनेचा नक्कीच आधार होईल, यासाठी वयाची मर्यादा काढण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी करणार आहे.
पेठ ग्रामपंचायतीतील माजी सरपंच सुरज चौधरी, पोलिस पाटील दत्तात्रय चौधरी व सामाजिक कार्यकर्ते सुजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील महिला अस्मिता भवन येथे मोफत हि योजना राबवली जात आहे. या योजनेसाठी अंगणवाडी सेविका, विमल चौधरी, कल्याणी गायकवाड, लखन राऊत, प्रतिक चौधरी व इतर युवक सहकारी कागदपत्रे तपासणी करून फॉर्म भरेपर्यंत सहकार्य करत आहेत.
दरम्यान, पेठ गावातील व आजुबाजूच्या गावातील महिलांना याचा फायदा होत असून झेरॉक्स पासून फॉर्म भरून देण्यापर्यंत सर्वच कामे या ठिकाणी केली जात आहेत. लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे वय वाढवून द्यावे या संदर्भात मागणी करणार असल्याचे सरपंच पल्लवी सुजित चौधरी यांनी यावेळी सांगितले.