लोणी काळभोर, ता. 13 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता.13) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. या परीक्षेत लोणी काळभोर (ता. हवेली) न्यू इंग्लिश मेडियम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने सलग सहा वर्ष 100 टक्के निकाल लावण्याची यशस्वी परंपरा जपली आहे. विद्यालयाचा विद्यार्थी संस्कार कोरे याने 97 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. अशी माहिती विद्यालयाच्या प्राचार्या पौर्णिमा शेवाळे यांनी दिली आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी विद्यालयाचे 85 विद्यार्थी बसले होते. यातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. त्यामुळे विद्यालयाचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे लोणी काळभोरसह परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. तसेच पालकांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
विद्यालयाचा विद्यार्थी संस्कार सुरेश कोरे याने 97 टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. अनुजा नंदकुमार साळुंखे हिने 92.60% गुण मिळवून द्वितीय तर सिद्धी ओमप्रकाश शर्मा व ओम अमोल कन्हेरे या दोन्ही विद्यार्थ्यांनी 92 टक्के गुण मिळविल्याने दोघांनाही एकसमान तृतीय क्रमांक मिळाला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी यशस्वी टक्केवारी प्राप्त करत विद्यालयाच्या यशाचा आलेख उंचाविला आहे.
दरम्यान, सलग सहा वर्ष 100 टक्के निकाल लावण्याची परंपरा विद्यालयाने जपली आहे. यासाठी विशेषता सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले आहेत. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे सहसचिव प्रशासन सीताराम गवळी यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या पौर्णिमा शेवाळे, सुलताना इनामदार, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.