पिंपरी: एका स्वयंघोषित भाईने टपरी चालकाला मारहाण करत हप्ता वसुली केली. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर सांगवी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसीखाक्या दाखवताच हात जोडून गयावया करू लागला. दरम्यान, सांगवी पोलिसांकडून त्याचा बिफोर आणि आफ्टर व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलिसांच्या या पॅटर्नची शहरात चर्चा रंगली आहे. श्यामबहादुर प्रतापसिंह (वय ४१, रा. पिंपळे गुरव, मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नकुल उर्फ नक्या गायकवाड (वय २०), त्याचा मित्र आकाश उर्फ आक्या शिवशरण (वय १९, दोघे रा. जुनी सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका टपरी चालकाला बरणीने आणि हाताने मारहाण करत त्याच्याकडे हप्त्याची मागणी करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मंगळवारी (दि. १३) व्हायरल झाला. हा व्हिडिओ सांगवी पोलिसांच्या हाती लागताच पोलिसांनी हप्ता मागणाऱ्या स्वयंघोषित भाई नक्या याला ताब्यात घेतले. आरोपी नक्या हा टपरी चालक प्रतापसिंह यांच्याकडे १०० रुपयांचा हप्ता मागत होता. प्रतापसिंह यांनी त्याला पैसे दिले. त्यानंतर देखील आरोपीने प्रतापसिंह यांना धमकवून मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून पान शॉपच्या गल्ल्यातून जबरदस्तीने सहा हजार रुपये काढून घेतले.
दरम्यान, पोलिसांनी नक्या याला ताब्यात घेतले. त्याला खाकीचा धाक दाखवला. त्यानंतर तो गयावया करू लागला. त्याने हा गुन्हा कबूल करत पुन्हा असे कृत्य करणार नाही, अशी विनवणी करत कुणीही अशा प्रकारचे कृत्य करू नये असे आवाहन केले. त्याचा खंडणी मागतानाचा आणि त्यानंतर पोलिसांसमोर गयावया करत असल्याचा एकत्रित व्हिडिओ शहरात वायरल झाला असून नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.