पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्टँडवर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तेजक इंजेक्शन विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या एका तरुणीला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून इंजेक्शनच्या ४६ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई गुरुवारी १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास स्वारगेट येथील सोलापूर एसटी स्टँड येथे केली.
याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रविण बाळासाहेब गोडसे (वय-३१) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन निकिता शशीकांत जाधव (रा. सह्याद्री हॉस्पीटल जवळ, बिबवेवाडी गावठान, पुणे) आणि दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करुन निकिता जाधव हिला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी निकिता हिने तिच्या नावावर १५ हजार ४०० रुपयांच्या मेफेनटरमाइन इंजेक्शन आयपी ४६ बाटल्या मागवल्या होत्या. तिने या बाटल्या दोन अल्पवयीन मुलांना विक्री करण्यासाठी दिल्या होत्या. आरोपींकडे इंजेक्शन खरेदी केलेल्या बाटल्यांचे खरेदी केलेले बिल नव्हते. या इंजेक्शनचे दुष्परिणाम होऊन, इंजेक्शन घेणाऱ्या व्यक्तीच्या जीवाला धोका किंवा आरोग्याला गंभीर इजा होऊ शकते, हे माहित असताना आरोपींनी मेफेनटरमाइन इंजेक्शन बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी बाळगताना आढळून आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी मुलीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करत आहेत.