पुणे : मुला-मुलींच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्यात समतामूलक वातावरण निर्मितीसाठी राज्यातील प्रत्येक शाळांत विविध स्तरावर सखी सावित्री समिती स्थापन करण्यासाठी दीड वर्षांपूर्वी शालेय शिक्षण विभागाने आदेश दिले होते. मात्र, काही अपवाद वगळता राज्यातील बहुतांश शाळांत या आदेशाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध स्तरावर ‘सखी सावित्री’ समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक शाळेला समिती स्थापन करावी लागणार आहे.
शाळा, केंद्रस्तर आणि तालुका स्तरावर सखी सावित्रीच्या समित्या स्थापन करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने १० मार्च २०२२ रोजी आदेश जारी केले होते. शाळा स्तरावर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षतेखाली १० जणांची समिती स्थापन केली जाणार होती. या माध्यमातून संबंधित कार्यक्षेत्रात मुला-मुलींची पटनोंदणी व १०० टक्के उपस्थिती साध्य करण्यासाठी गावातील प्रत्येक घरी जाऊन शिक्षक आणि बालरक्षकांनी संबंधित गावांमध्ये भेटी देत विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करण्याचे नियोजन होते. या आदेशाची काही तालुक्यांचा अपवाद वगळता कुठेही नीट अंमलबजावणी होऊ शकली नाही.
सद्य:स्थितीत मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत प्राधान्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. घर, शाळा आणि समाजात मुला-मुलींना सुरक्षित व बालस्नेही वातावरण मिळावे तसेच त्यांचे सामाजिक, भावनिक, अध्ययन उत्तमरीत्या व्हावे, यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२५व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विविध स्तरावर समित्या गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, बालहक्क संरक्षण कायद्यानुसार सर्वच बालकांच्या हिताचे, हक्कांचे रक्षण करणे महत्त्वाचे झाले आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी, निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर ‘सखी सावित्री’ समिती स्थापन करण्याबाबत राज्य सरकारने निर्देश दिले आहेत. तसेच समितीचा अहवाल कार्यालयास पाठवण्याच्या सूचनाही विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिल्या आहेत. त्यामुळे शालेय मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी निकोप वातावरणनिर्मिती होण्यास निश्चितच मदत होणार आहे.