(RTE Admission) पुणे : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठी अर्ज (RTE Admission) करण्याची मुदत शनिवारी संपली असून, पुण्यातील ९३६ शाळांमधील प्रवेशासाठी १५ हजार ६५५ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी सर्वाधिक ७७ हजार ९०१ पालकांनी अर्ज केले आहेत.
आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश राखीव ठेवले जातात. त्यासाठी शिक्षण विभागाकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया शनिवारी पूर्ण झाली.
पालकांचे लक्ष प्रवेशाच्या लॉटरीकडे…!
सन २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षासाठी आपल्या पाल्यास प्रवेश मिळावा, यासाठी यंदा मोठ्या संख्येने पालकांनी अर्ज केले असून, पुणे जिल्ह्यात राखीव जागांवरील प्रवेशासाठी अर्जाची संख्या जास्त आहे. त्यामुळे शहरातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळणे अवघड ठरणार आहे. जिल्ह्यात उपलब्ध जागांच्या पाच पट अर्ज आले असून, आता पालकांचे लक्ष प्रवेशाच्या लॉटरीकडे लागले आहे.
पालकांनी प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी आरटीईच्या संकेतस्थळास वेळावेळी भेट द्यावी, असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे. तसेच आरटीई प्रवेश प्रक्रियेत अर्जांची पडताळणी झाल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रवेशाची लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे.
त्यानंर पालकांना अर्ज केलेल्या मोबाइल क्रमांकावर प्रवेशाची माहिती पाठविली जाईल. त्यानुसार आपल्या अर्जाचा क्रमांक आणि पासवर्ड टाकूनही मुलाच्या प्रवेशाची स्थिती जाणून घेऊ शकतील. निवड झालेल्या मुलांचा प्रवेश घेण्यासाठी पालकांना पुरेसा कालावधी देण्यात येईल, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.