उरुळी कांचन, (पुणे) : माहिती अधिकार कायदा हा सर्वसामान्य नागरिकांसाठी फार उपयुक्त असून शासकीय कामाच्या व्यापामुळे काहीजण माहिती अधिकारी यांना माहिती देण्यास विलंब होतो. परंतु जनमाहिती अधिकारी यांनी विहित मुदतीत माहिती देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन सहाय्यक गटविकास अधिकारी शितल बुलबुले यांनी केले.
शासकीय कामात पारदर्शकता व गती निर्माण व्हावी, यासाठी माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आला. या कायद्याची सर्वसामान्य नागरिकांना माहिती व जनजागृती व्हावी. यासाठी मंगळवारी (ता. 01) दौंड पंचायत समिती येथील स्वर्गीय बाबुराव कुल सभागृह येथे सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बुलबुले बोलत होत्या.
यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य कार्यकारणी सदस्य राहुलकुमार अवचट, माहिती अधिकार कार्यकर्ते जयदीप बगाडे, सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी पोपट कुंभार, तालुका आरोग्य अधिकारी उज्वला जाधव, कृषी अधिकारी दिनेश अडसूळ, रमेश भद्रोड, बांधकाम विभागाचे उपअभियंता राठोड, फुलारी, कोळी सहाय्यक लेखाधिकारी आर. बोंदर्डे यांसह कृषी, पंचायत, जि. ग्रामीण विकास यंत्रणा आदी विभागांचे विस्तार अधिकारी, अधीक्षक, कक्ष अधिकारी, सर्व सहाय्यक अधिकारी व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राहुल कुमार अवचट म्हणाले, “सर्वसामान्य नागरिकांना सरकार दरबारी सुरु असलेल्या विविध बाबींची माहिती व्हावी, हे माहिती करून घेण्याचा अधिकार या कायद्याने मिळाला असून, त्याचे महत्त्व सर्वांना कळावे. त्यांना ती माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी माहितीचा अधिकार कायदा 2005 साली अस्तित्वात आला असून सध्या 90 पेक्षा जास्त देशात हा कायदा लागू आहे. पंचायत समिती मार्फत कार्यशाळा आयोजित केल्यास सर्व शासकीय अधिकारी यांना माहिती अधिकार अधिनियम 2005 या कायद्याचे प्रशिक्षण दिले जाईल असे आश्वासन दिले.
जयदीप बगाडे यांनी माहिती अधिकार कायद्याचा उगम कसा झाला, माहिती अधिकार दिन साजरा करण्याबाबत दौंड पंचायत समितीने गेल्या 4 वर्षांपासून सुरू केलेल्या उपक्रमाबद्दल कौतुक केले. यावेळी माहिती अधिकार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध व प्रश्नमंजुषा स्पर्धेतील पाटस शाळेतील शिवानी परशुराम भागवत, सुमन इंद्रकुमार साहू, कुरकुंभ शाळेतील राधिका गणेश जाधव, बेटवाडी शाळेतील अनुष्का दत्तात्रय जाधव, अन्वी संतोष जाधव सोनवडी शाळेतील अनुष्का सचिन देसाई व वैष्णवी रामदास जाधव या प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी संजय महाजन यांनी केले. यावेळी सूत्रसंचालन व आभार सामाजिक न्याय विभागाचे नाना मारकड यांनी मानले.