पुणे: महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना, पुणे जिल्हा शाखा यांच्यामार्फत सालाबादप्रमाणे रविवारी पुणे जिल्हयातील सेवानिवृत्त महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. स्नेहमेळाव्यास पुणे जिल्हयातील सर्व संवर्गातील म्हणजेच कोतवाल, शिपाई, वाहन चालक, तलाठी, लिपिक, मंडल अधिकारी, अव्वल कारकून, नायब तहसिलदार, तहसिलदार, उपजिल्हाधिकारी इत्यादी पदावरुन सेवानिवृत झालेले अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना पुणे जिल्हा शाखेच्या सन 2024 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत पाचार यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उस्मानाबाद जिल्ह्यातील आळणे येथील मंतिमंद बेवारस मुलींची आश्रमशाळा चालविणारे शहाजी चव्हाण यांनी त्यांच्या मनोगतामध्ये संस्थेचा प्रवास कथित केला. त्यांनी या संस्थेत आज 116 मुली संस्थेत राहत असून त्यातील 107 बेवारस मुलींची कथा म्हणजे एक कादंबरी होईल, असे सांगितले. या मुलींच्या व्यथा जाणून घेताना उपस्थितांची मने हेलावून गेली.
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दिपक चव्हाण यांनी सेवानिवृत्तांसमोर नतमस्तक होताना आपण व आपले सहकारी अशाच प्रकारच्या मेळाव्यांचे यापुढेही सामाजिक भान जपत आयोजन करीत राहू अशी ग्वाही दिली. जिल्हाध्यक्ष श्रीनिवास कंडेपल्ली यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये आपल्या आधीच्या पिढीच्या सहकाऱ्यांचा एकमेकांना भेटल्याचा आनंद बघुन आपल्याला उर्जा मिळते, अशी भावना व्यक्त केली. सुरुवातीला विनायक राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत करताना नववर्षाच्या व येणाऱ्या मकरसंक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा सरचिटणीस सचिन तांबोळी यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुप्रसिद्ध निवेदक संजय पोमण यांनी केले. या उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा संघटनेच्या सचिन तारु, मिलींद पोळ, विकास औताडे, प्रकाश धानेपकर, अंकुश आटोळे या पदाधिकाऱ्यांनी केले. याप्रसंगी सुधीर तेलंग, निर्मला चौधरी, नामदेव शिंदे, शशिकांत नेवासकर, किशोर गंभीर, दत्तात्रय मेहता, रामभाऊ माने, श्री गुरुनाथ थोडसरे सर, चंद्रशेखर जाधव, रामभाऊ भंडारी हे उपस्थित होते.