बापू मुळीक
सासवड: सासवड नगरपालिकेत सध्या प्रशासकीय राजवट आहे. या स्थितीत शहरातील नागरिकांच्या विविध विकास कामांबाबत अधिक सुसूत्रता यावी तसेच अनेक कामांबाबत सुधारणा करण्यात याव्यात, अशा आशयाचे निवेदन सासवड शहर भाजपाच्या वतीने देण्यात आले. पक्षाचे शहर अध्यक्ष आनंद संजय जगताप यांनी या बाबतचे निवेदन पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांना दिले आहे.
शहराचा विस्कळीत पाणी पुरवठा, कचरा संकलन करणाऱ्या घंटा गाड्यांची अनियमितता, सार्वजनिक उद्यानांची दुरावस्था, थोर पुरुषांच्या पुतळ्यांची देखभाल व संरक्षण, सोमवारच्या आठवडे बाजारातील गोंधळाची स्थिती तसेच त्याच्या जागेचा प्रश्न, सासवड येथील महिला बचत गटांसाठी उत्पादित मालाला बाजारपेठ व जागा, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणाऱ्या फ्लेक्स बाबत धोरण व नियमावली अशा अनेक बाबी या निवेदनात मांडल्या असुन त्यावर तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी जेजुरी देवस्थानचे विश्वस्त ॲड विश्वास पानसे, महिला आघाडी प्रमुख रुपाली क्षीरसागर, सिद्धी शेलार, जयेंद्र निकम, समीर कामत, राहुल भोंडे, मयुर जगताप, प्रदिप जगताप, उदयराज जगताप, विवेक लेंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.