लोणी काळभोर: दारु पिल्यानंतर मोटारसायकलची रेस केल्याचा राग मनात धरून भाडेकरूने घरमालकाला मारहाण करीत पाण्याच्या टाकीत बुडवून खून केल्याची धक्कादायक घटना ऊरूळी देवाची (ता. हवेली) खंडोबा माळ परिसरात रविवारी दुपारी बारा ते दीड सुमारास घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
दादा ज्ञानदेव घुले (वय ५०, रा. खंडोबा माळ, उरुळी देवाची) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर संतोष राजेंद्र धोत्रे (वय ३७, रा. खंडोबा माळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मयत दादा घुले यांचा पुतण्या प्रथमेश संतोष घुले, (वय १९, रा. सर्व्हे नं ९६ घुले वस्ती, मांजरी रोड, जय मल्हार कॉलनी, दत्त मंदिरा समोर, मांजरी बुद्रुक, हडपसर, ता.हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादा घुले हे फिर्यादी प्रथमेश यांचे चुलते होते. ते उरुळी देवाची येथील खंडोबाचा माळ या ठिकाणी राहत होते. दादा घुले यांचे लग्न झालेले आहे. मात्र त्यांची पत्नी त्यांच्या सोबत राहत नाही. त्यामुळे ते आपल्या आई वडीलांसमवेत राहतात. त्यांना दारु पिण्याचे व्यसन होते. तर आरोपी धोत्रे हा भाडेकरू म्हणून कुटुंबासोबत त्यांच्या चाळीत राहतो.
दरम्यान, २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.४१ वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांनी प्रथमेश याला फोन करून दादा हे दुपारी १.३० वाजल्यापासुन घरी आलेला नाही. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तो दारू पिऊन मोटारसायकलची जास्त रेस करत होते. त्यामुळे भाडेकरु संतोष धोत्रे व त्यांचे भांडण झाले असुन त्याने दादास मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. आजोबांनी त्यांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते दोघेजण आजोबांचे ऐकत नसल्याने आजोबा घरापासुन बाहेर रस्त्याकडे निघुन गेले होते. त्यानंतर साधारण दीड तासाने आजोबा परत घरी आले तर दादा घरी नव्हता. त्यामुळे आम्ही त्याचा शोध घेत आहोत, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
त्यानंतर रविवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास प्रथमेश आपला मित्र प्रतिक भोसले यास घेऊन आजी व आजोबा राहत असलेल्या ठिकाणी गेला. त्यावेळी घरात पाहणी केली असता त्याला दादाची चप्पल व मोबाईल घरातील पार्किंगच्या जमिनीखालील पाण्याच्या टाकीजवळ दिसली. म्हणुन त्याने टाकीमध्ये डोकाऊन पहिले असता त्याला चुलत्यांचे शरीर पाण्यावर तरंगत असताना दिसले. त्यानंतर त्यांनी लागलीच जवळपासचे लोक बोलावून चुलत्यांना पाण्याच्या टाकीतून बाहेर काढले. त्यावेळी ते मयत झाले होते.
दरम्यान, दादा यांच्या शरीरावर, पाठीवर, हाताच्या कोपऱ्यावर, डोक्याच्या पाठीमागील बाजुस जखमा झालेल्या दिसत होत्या. सदर बाबतची माहिती तात्काळ लोणी काळभोर पोलीसांना देण्यात आली. पोलीस आल्यानंतर मृतदेह तपासणीसाठी ससून हॉस्पिटल पुणे येथे नेण्यात आला. शवविच्छेदन केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू पाण्यात बुडाल्यामुळे झाला असल्याचे सांगितले. या प्रकरणी प्रथमेश संतोष घुले यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीला संतोष धोत्रे याला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहेत.