पुणे : ऐन विधानसभा निवडणुकीत पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्षा पूजा आनंद यांची पदावरुन उचलबांगडी केली आहे. त्यांच्या जागी काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या संगीता तिवारी यांची पुणे शहर महिला काँग्रेस प्रभारी अध्यक्षपदाची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे काँग्रेस मधील ज्येष्ठ नेत्यांनी तीन मतदारसंघात बंडखोरी केल्याने त्यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
यामध्ये पर्वती मतदारसंघात आबा बागूल, कसबा मतदारसंघात कमल व्यवहारे तर शिवाजीनगर मतदारसंघात मनिष आनंद यांचा समावेश आहे. खडकी कॉन्टन्मेंटचे माजी उपाध्यक्ष राहिलेल्या मनिष आनंद यांच्या पत्नी पूजा आनंद या पतीच्या प्रचारात सक्रीय झाल्याने त्यांच्यावर काँग्रेस पक्षाने कारवाई केली आहे. त्यांची पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्ष पदावरुन हाकालपट्टी केली आहे.
पूजा आनंद यांच्या जागी संगीता तिवारी तात्पुरती नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी दिला आहे.
याबाबत बोलताना संगीता तिवारी म्हणाल्या की, महिला प्रदेश काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे व पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी माझी प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. चांगल्याप्रकारे महिला संघटन करुन काँग्रेस पक्षाचे विचार समाजात तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम मी पुढील काळात करणार आहे, असे मत संगीत तिवारी यांनी व्यक्त केले.