पुणे : पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. पुण्यात महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राबाहेरून अनेक तरुण तरुणी शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायासाठी येत असतात. छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांनी पुण्याला वैभव मिळवून दिले. तसेच देशाला दिशा देणारे अनेक मान्यवरपुण्यात होवून गेले. असं असताना पुण्याला काळिमा फासणाऱ्या घटना मागील काही काळात घडल्या आहेत.
तसेच मागील पाच-सहा वर्षांत फोफावलेल्या पब संस्कृती आणि अंमली पदार्थांमुळे पुण्याचं स्वरूप’उडता पंजाब’ सारखं झालं आहे, असं काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, त्यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
काय म्हणाले रवींद्र धंगेकर?
गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये पब संस्कृती पुणे शहरात आली आहे. त्यामुळे ‘उडता पंजाब’ सारखं ‘उडतं पुणे’ असं पुण्याचं स्वरूप झालं आहे. पुण्यात अंमली पदार्थांचा सुळसुळाट झाला. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर विधानसभेच्या अधिवेशनात याबद्दल बाजू मांडली. तरीही कोणी दाद देत नव्हतं किंवा लक्ष देत नव्हतं. त्यानंतर संवैधानिक मार्गाने मी रस्त्यावर उतरलो.
त्यामध्ये पुण्यात पब संस्कृती बंद व्हावी अशी मागणी केली. सगळे लोक, मुलं-मुली हे चांगले राहायला हवे. कारण ही मुलं आता उमलती फुलं असून ते कोमजण्याचं काम हे ही पब संस्कृती आणि अंमली पदार्थ करत असल्याचे रवींद्र धंगेकर म्हणाले.
कल्याणीनगर अपघात प्रकरणाबाबत धंगेकर म्हणाले, कल्याणीनगर अपघात प्रकरणी यांच्या सिस्टिमने पैसे खाऊन दोन एफआयआर लिहिले. त्यातील एका एफआयआरमध्ये त्यांना सोडून देण्यात आले. त्यांनंतर सर्व पुणेकर रस्त्यावर उतरले. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येवून पोलिसांची सावरासावर केली आणि निघून गेले. तरीही पुणेकर गप्प बसत नाही हे लक्षात आल्यानंतर पुणे पोलिसांनी दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केलं.
त्यानंतर तपास दुसऱ्या अधिकाऱ्याकडे दिला. त्यानंतर ससूनमधील कारभार चव्हाट्यावर आला. पहिल्या दिवसापासून यामध्ये गौडबंगाल झालं असल्याचं आम्ही म्हणत होतो. चुकीचे लोक यामध्ये तपास करत आहेत. त्यानंतर तपासाची सुई डॉ. अजय तावरे कडे वळली. तपासामध्ये तावरे यांनी गंभीर काम केलं असल्याचं उघड झालं.
अगदी रक्ताचा नमुना देखील फेकून देण्यापर्यंत त्यांची मजल गेली. आरोपीचं रक्त न घेता दुसऱ्याचे रक्त घेतले. इतक्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा त्यांनी केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. यामध्ये तपास अधिकाऱ्यांचा मला अभिमान वाटतो, असे रवींद्र धंगेकर म्हणाले.