पाटस: भाजप आणि काँग्रेस आम्हाला समान अंतरावर आहेत, दोन्हीही मोठे पक्ष छोट्या पक्षांना खाऊन टाकत आहेत. मी आमदार करणारा माणूस त्यांच्याकडे मी भीक मागत बसू का? उद्या त्यांचे राज्य सरकारही बनेल. पण, मला विचारल्याशिवाय मुख्यमंत्री बनणार नाही, असे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितले.
राष्ट्रीय समाज पक्षाकडून कार्यकर्ता निर्धार मेळाव्याचे आयोजन पाटस (ता. दौंड) येथे सोमवारी करण्यात आले होते. यावेळी जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाने २५ संभाव्य उमेदवारांची यादी काही दिवसांपूर्वी जाहीर केली, असे सांगितले. जानकर म्हणाले की, या मेळाव्यातून दौंडच्या उमेदवाराचे नाव जाहीर होणार नाही. मेळावा होणार आहे. दौंडसाठी सक्षम उमेदवार आल्यानंतर नाव निश्चित केले जाईल. आज लोकांचे मत जाणून घेण्यात येईल, पार्लमेंटरी बोर्डाकडे ती यादी पाठवून नाव निश्चित केले जाईल. दोन-तीन जणांची नावे आली आहेत. परंतु, पार्लमेंटरी बोर्डाकडे अंतिम निर्णय आहे.
आता महायुतीत बोलावले, तरी परत जाणार नाही. आता आमचे काय होईल, यासाठी आम्ही खंबीर आहोत. २०१४ मध्ये दौंडमधील जनतेने माझ्यावर आमदार निवडून देऊन उपकार केले आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष सक्षम उमेदवार देणार, आता उमेदवार जाहीर केला तर उमेदवार पळवून नेतील. २८८ जागांपैकी १९१ उमेदवारांची यादी तयार आहे. मी या निवडणुकीत कोणालाही सोडणार नाही, असेही जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.