पुणे : विवाहीत महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. एवढच नाही तर तिच्याकडून सोन्याचे दागिने आणि पैसे घेऊन लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक केली. हा प्रकार 2019 ते 1 जून 2024 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एका व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत 36 वर्षीय महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अजित भिमराव वनवे (रा. मु.पो. कासार शिरशी, ता. जि. बिड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिलेचे पहिले लग्न झाले असून त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. सदर महिला एका हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. त्याच हॉस्पिटलमध्ये आरोपी देखील कामाला आहे. त्या दोघांमध्ये मागिल सहा वर्षापासून संबंध आहेत. त्यांच्या संबंधाची माहिती महिलेच्या पतीला समजल्यानंतर ते दोघे विभक्त राहू लागले. आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
पैसे व दागिने घेऊन प्रियकर पसार
दरम्यान, आरोपी वनवेने महिलेला लग्न करणार असल्याचे आमिष दाखवून तिच्याकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेतली. महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. तसेच महिलेची शारीरिक, मानसिक व ब्लॅकमेल करुन आर्थिक पिळवणूक केली. तसेच तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत तसेच मुलीवर अत्याचार करण्याची धमकी देऊन पैसे घेतले.
तसेच महिलेला मारहाण करुन वारंवार अत्याचार केले. आरोपी वनवे पैसे आणि दागिने घेऊन पसार झाला, याबाबत महिलेने तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून शोध सुरु केला आहे.