पुणे : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटच्या एआय आणि एआयएमएल विद्याशाखेच्या तृतीय वर्षातील विद्यार्थी लक्ष्य माकोडे आणि तेजस मुंढे यांनी नुकत्याच झालेल्या टेक अल्केथॉन हॅकाथॉन स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले. टेक अल्केमी ही ब्रिटन स्थित कंपनीने दोन दिवसीय हॅकाथॉनचे आयोजन केले होते. या हॅकाथॉनमध्ये राज्यातून १२० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात उल्लेखनीय कामगिरी करत रायसोनीच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
‘टेक अल्केथॉन २०२४’ने सहभागी विद्यार्थ्यांना कोडिंग क्षेत्रातील आव्हाने, उद्योगातील तज्ञांशी संवाद आणि नेटवर्किंगच्या संधी शोधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची प्रतिभा, समर्पण आणि वास्तविक जगातील तांत्रिक अडथळ्यांना तोंड देण्यासाठी प्रवीणता दिसून आली.
लक्ष्य माकोडे आणि तेजस मुंडे यांनी ब्लॉकचेन आधारित समस्या विधान “DeFi: विकेंद्रित वित्त” वर काम केले आणि सॉलिडिटी लँग्वेज वापरून “एरो एक्सचेंज” म्हणून समाधानाचे प्रात्यक्षिक केले. त्यांच्या अभिनव प्रयोगाने प्रभावित होऊन त्यांना ५० हजारांचे रोख रकमेचे पारितोषिकही मिळाले. यासाठी प्रा. रचना साबळे आणि प्रा. प्रणिता मोकल यांनी विद्यार्थी प्रकल्पासाठी मार्गदर्शक म्हणून काम केले.
जीएचआरसीईएम, पुणेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर यांनी लक्ष्य आणि तेजस यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले. त्यांचे यश महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये नाविन्य, उत्कृष्टता आणि नेतृत्व वाढवण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते, असे त्यांनी सांगितले.
रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष सुनील रायसोनी, रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे कार्यकारी संचालक श्रेयश रायसोनी आणि, जीएचआरसीईएम, पुणेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर आणि जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटच्या सर्व शिक्षकांनी लक्ष्या आणि तेजस यांचे अभिनंदन केले.