सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक
पुरंदर ता.२६ : श्री क्षेत्र वीर (ता.पुरंदर) येथे रविवारी अमावास्येनिमित्त श्रीनाथ म्हसोबा मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनासाठी आलेल्या शेकडो भाविकांना समस्त बुरुगले परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन, परिसरात सावली करुन फरशीवर पायघड्या टाकण्यात आल्या होत्या, भाविकांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने राजेंद्र धुमाळ यांनी सांगितले.
पहाटे ४.३० वाजता पूजा केल्यानंतर मुख्य गाभारा बंद करण्यात आला. त्यानंतर सकाळी ६ वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळपासून देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे देवाचा अभिषेक करण्यात आला. सकाळी १० वाजता देवाला भाविकांकडून दही, भाताचा नैवेद्य दाखवण्यात आला. देऊळवाड्यात सालकरी, गोसावी मंडळींचा पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरु होता. दुपारी १२ वाजता धुपारती झाल्यावर गाभारा तासभर बंद करण्यात आला. दुपारी १.१५ मिनिटांनी गाभारा पुन्हा दर्शनासाठी खुला करण्यात आला.
देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, लाईट व जनरेटर, दर्शनबारी, तीन ठिकाणी वाहनतळ व्यवस्था, परिसर स्वच्छता, जादा कर्मचारी, स्वयंसेवक, ट्रॅफिक पोलिस आदी व्यवस्था पुरवण्यात आली असल्याचे देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष अमोल धुमाळ यांनी सांगितले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त काशिनाथ धुमाळ, प्रमिला देशमुख, सुनील धुमाळ, विराज धुमाळ, अमोल धोंडीबा धुमाळ, श्रीकांत थिटे, बाळासाहेब समगीर, जयवंत सोनावणे, अलका जाधव आदी विश्वस्त मंडळ तसेच सल्लागार मंडळ उपस्थित होते.