Purv Haveli News : लोणी काळभोर, (पुणे) : बाप बड़ा न भैया, सबसे बड़ा रुपया… असे म्हणतात ते काही खोटे नाही. कारण संपत्तीच्या वादातून भाऊच भावाच्या जीवावर उठल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या, ऐकल्या असतील. मात्र, बंधुप्रेमाची उदाहरणेही काही कमी नाहीत. कुटुंबातील आपलेपणा अनेकदा मनाला चटका लावून जातो. अशीच एक घटना नुकतीच कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा परिसरात घडली आहे.
आजारी असलेल्या लहान भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजताच, मोठ्या भावालाही हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला आणि त्यातच त्याचे निधन झाले. दोन भावांच्या निस्सिम प्रेमाची निःशब्द करून टाकणारी ही घटना ऐकणाऱ्याच्या डोळ्यांत पाणी आणते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
लहान भावाच्या मृत्यूचा आघात सहन न झाल्यामुळे मोठ्या भावानेही आपले प्राण सोडल्याची ही घटना मन हेलावणारी आहे. दोन्ही सख्ख्या भावांचे एक दिवस आड निधन झाल्याने कुंजीरवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दशरथ विनायक गायकवाड (वय ७२) व जयवंत विनायक गायकवाड (वय ७९) असे निधन झालेल्या दोन सख्ख्या भावंडांची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दशरथ गायकवाड हे आजारी होते. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचे बुधवारी (ता. २६) निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती बंधू जयवंत गायकवाड यांना समजली. गुरुवारी काम करीत असताना ते अचानकपणे जमिनीवर कोसळले. जयवंत गायकवाड यांना तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याची माहिती नातेवाईकांना दिली.
दरम्यान, जयवंत गायकवाड व दशरथ गायकवाड हे दोघेही शेती व्यवसाय करीत होते. दोघांच्याही पश्चात प्रत्येकी दोन मुले, मुलगी असा मोठा परिवार आहे. एक दिवसाच्या अंतराने घरातील दोन सख्खे भाऊ गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन्ही भावांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. Purv Haveli News