पुणे : मुंबईतील महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व नाफेड तसेच नॅशनल को-ऑप. कन्जुमर फेडरेशन (एनसीसीएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम २०२४-२५ मध्ये केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मूग, उडीद व सोयाबीनची खरेदी सुरू होत आहे, अशी माहिती पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांनी दिली आहे. ही योजना शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, याकरिता राबविण्यात येत आहे.
त्यानुसार खरेदीकरिता शेतकरी नोंदणी दिनांक १ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू केली आहे. प्रत्यक्षात मूग, उडीद खरेदी १७ ऑक्टोबरपासून, तर सोयाबीन खरेदी १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येत आहे. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार व दिलेल्या कालावधीत मूग, उडीद व सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी मूग खरेदीसाठी ७७, उडीदासाठी ८१ शेतकरी, तर सोयाबीन खरेदीसाठी ४२ हजार ७०८ शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्राने निर्धारित केलेला दर प्रतिक्विंटलला मूग ८ हजार ६८२, उडीद ७ हजार ४०० आणि सोयाबीनचा दर ४ हजार ८९२ रुपये आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांनी केले आहे.
शेतमाल हमीभाव प्रती क्विंटल
मूग ८,६८२
उडीद ७,४००
सोयाबीन ४,८९२