हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : पूर्व हवेलीत पुरेसा पाऊस झाला नाही. परिणामी, सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुरंदर उपसा सिंचन योजनेतून शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पाझर तलाव भरून द्यावेत, अशी मागणी शिंदवणे येथील ग्रामस्थांनी उपसा सिंचनच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.
पुणे जिल्ह्याच्या पूर्व हवेलीत तुरळक पाऊस झाला. या पावसाने ओढ दिल्यामुळे सध्या पाण्याची परिस्थिती बिकट आहे. पुरंदर हवेलीचे तत्कालीन आमदार दादा जाधवराव व तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी पंपहाऊससाठी जागा दिल्यामुळे शिंदवणे येथील पाझर तलाव वर्षातून दोनदा भरून दिला जाईल, असे तोंडी आश्वासन दिले होते. मात्र, हा तलाव एकदाही भरण्यात आलेला नाही. पण आता पुरंदर उपसा सिंचन योजनेतून पाझर तलाव भरून द्यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पाझर तलावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांसह जनावरांना पिण्याचे पाणी पुरवायचे कसे हा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून हे पाणी जास्तीत जास्त भागापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. या पाझर तलावावर शेती, ग्रामस्थांचे पिण्याचे पाणी, पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची जनावरे, डोंगरातील प्राणी, हरीण, मोर, लांडगे व विविध प्राणी या तलावातील पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे या पाण्याची सोय लवकरात लवकर करावी, अशी मागणी केली जात आहे.
पाणी सोडण्याला कोणताही अतिरिक्त खर्च नाही..
बारामतीकडे जाणारी पुरंदर उपसा सिंचन पाईपलाईन ही कालव्याच्या मध्यातूनच गेलेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या व्हॉल्व्हमधून पाणी सोडले तर हे पाणी थेट पाझर तलावात जाणार आहे. तसेच आणखी एक व्हॉल्व्ह हा कालव्यापासून एक ते दीड हजार फुटावर आहे. त्यातूनही पाणी सोडले तरी हे पाणी ओढ्याच्या माध्यमातून थेट कालव्यात येत आहे. त्यामुळे त्याला कोणताही जास्त खर्च करण्याची गरज नाही. सध्या बारामती, सासवड, जेजुरीकडे पाण्याचे आवर्तन सुरू आहे. त्यामुळे शिंदवणे येथील पाझर तलाव पिण्याचे पाण्याची टंचाई म्हणून तातडीने भरून द्यावेत.
पाण्याअभावी पिके जळून जाण्याच्या मार्गावर..
या भागात पुरेसा पाऊस न झाल्याने पिण्याचे पाणी, जनावरांना चाराटंचाई जाणवत मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. पाण्याअभावी शेतातील पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. तर खडकवासला धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. त्यामुळे गावातील पिण्यासाठी पाणी व चारा पिके आणि शेतातील उभ्या पिकांसाठी तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
याबाबत सिंचन कार्यालय स्वारगेटचे कार्यकारी अभियंता महेश कानिटकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांचाशी संपर्क होऊ शकला नाही.
याबाबत बोलताना भाजपाचे हवेली तालुका किसान मोर्चाचे अध्यक्ष गुरुनाथ मचाले म्हणाले, “शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पाझर तलावात पुरंदर उपसा सिंचन योजनेतून पुढील पंधरा दिवसात पाणी सोडले नाही तर भारतीय जनता पार्टीच्या व ग्रामस्थांच्या वतीने शिंदवणे येथील पंप हाउसला टाळे ठोकले जाणार आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पाणी सोडावे.”