पुणे : पुण्यातील बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी एकाला अटक केली असून, न्यायालयाकडून आरोपीला अधिक तपासासाठी ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावन्यात आली आहे.
चंद्रकुमार रवीप्रसाद कनोजिया (वय-२०, रा. डिंडोरी, मध्य प्रदेश) असे नराधम आरोपीचे नाव आहे. पुण्यातील येवलेवाडी परिसरातून चंद्रकुमार याला कोंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने अन्य दोघा साथिदारांच्या बरोबर हे कृत्य केल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. अटकेनंतर पोलिसांनी त्याला शनिवारी दुपारी शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयात सांगितले आहे की, आरोपीचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. आरोपी चंद्रकुमार याच्या मदतीने त्यांचा शोध घ्यायचा आहे. ज्या हत्याराने पिडितेला धमकाविले आहे, ते हत्यार जप्त करायचे आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याचा डीएनए अहवाल प्राप्त करायचा आहे.
दरम्यान, आरोपीने पीडितेकडे असलेली सोन्याची चैन चोरली आहे, ती जप्त करायची आहे. असे सांगून पोलीस कोठडी करण्यात यावी अशी मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयाकडे केली आहे. न्यायालयाने ती मागणी मान्य करत ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक युवराज हांडे करीत आहेत.