पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सायंकाळी रामायणातील व्यक्तिरेखा असलेले नाटक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले. नाटकातील संवादातून भावना दुखावल्या प्रकरणी ललित कला केंद्राचे विभागप्रमुख प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पात्रांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद असल्याचा, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप अभाविपकडून करण्यात आला. याबाबत अभाविपंकडून तक्रार देण्यात आली.
दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या विभाग प्रमुखांना ‘रामलीला’ प्रकरणात ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने विभागप्रमुखांसह अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सकाळी विभाग प्रमुख डॉ. प्रवीण भोळे आणि अन्य विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले असून त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
श्रीराम व सीतामाता यांच्या तोंडी शिव्या आणि आक्षेपार्ह संवाद वापरण्यात आल्याने, हे नाटक बंद पाडल्याची भूमिका अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने घेतली आहे. तर रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्य दाखविण्याचा प्रयत्न या नाटकातून झाल्याचे समजते. ‘जब वी मेट’ या नावाची ही संहिता आहे. तसेच विभागाच्या विद्यार्थ्यानेच त्याचे लेखन व दिग्दर्शन केले आहे.
या घटनेचे सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात पडसाद उमटल्याचे दिसून येत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी विभाग प्रमुख आणि विद्यार्थ्यांवर धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान, हेतू पुरस्कर उद्देशाने केलेले अश्लील कृत्य आणि दंगा करण्याबद्दलची शिक्षा आदी कलमे लावण्यात आली आहे. यामध्ये सहा महिन्यांसह दोन वर्षांपर्यंतच्या कारावासाची आणि दंडाची तरतूद आहे.