पुणे : पोलीस असल्याची बतावणी करुन गळ्यातील सोन्याची चैन आणि अंगठी बटव्यामध्ये ठेवण्यास सांगून तो बटवा डिक्कीत व्यवस्थित ठेवला आहे की नाही, हे पहाण्याचा बहाणा करून चोरट्याने हातचलाखी करुन बटव्यातील ८० हजार रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत काळुराम बबन वाडकर (वय-५५, रा. भेकराईनगर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पुण्यातील तुळशीबाग ते मंडई दरम्यान सार्वजनिक रस्त्यावर २७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाडकर हे विक्रेते आहे. ते व्यवसाय करण्याच्या ठिकाणी गाडीतील विक्रीचा माल उतरवून थांबले असताना एक अनोळखी व्यक्ती आला व त्याने पोलीस असल्याची खोटी बतावणी केली. फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, हातातील सोन्याची अंगठी त्यांच्या बटव्यामध्ये ठेवण्यास सांगितले. तसेच तो बटवा फिर्यादी यांच्या गाडीतील डिक्कीमध्ये ठेवण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी बटवा ठेवला असता त्या वस्तू व्यवस्थित ठेवल्या आहेत का? हे पाहण्याचा बहाणा करुन त्याने हातचलाखीने सर्व वस्तू काढून घेऊन निघून गेला. काही वेळाने ८० हजार रुपयांच्या या वस्तू डिक्कीत नसल्याचे वाडकर यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरवडे करीत आहेत.