पुणे : पुण्यातील एनडीए रस्ता परिसरात दहशत माजवणाऱ्या गुंडाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (MPDA) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. प्रसन्न उर्फ बाळा मनोज कदम (२३, रा. शांतीबन सोसायटी, शिवणे, एनडीए रस्ता) असं कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे.
कदम आणि त्याच्या साथीदारांनी गंभीर गुन्हे केले आहेत. कदम विरोधात गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ८२ गुंडांविरुद्ध एमपीडीए कारवाई केली असून, गुंडांची रवानगी वेगवेगळ्या कारागृहात करण्यात आली आहे.
आरोपीविरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव उत्तमनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण बालवडकर आणि गुन्हे प्रतिबंधक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी तयार केला होता. पोलिस आयुक्तांकडे प्रस्ताव पडताळणीसाठी पाठवण्यात आला.
पोलिस आयुक्तांनी प्रस्ताव मंजूर करून, कदम याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. कदम याला वर्षभरासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ८२ गुंडांविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे.