पुणे : पुणे-सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटी समोरील रस्त्यावरच चक्क २ जणांकडून गांजाची विक्री करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या त्या दोघांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक १ ने अटक केली आहे. त्यशिवाय, त्यांच्याकडून ७ लाख ३६ हजार ९०० रुपयांचा ३६ किलो ८९६ ग्रॅम गांजा जप्त केला गेला आहे.
हर्षल दिलीप बोरा (३१, रा. अरिहंत सोसायटी, सॅलेसबरी पार्क, स्वारगेट) आणि रवींद्र हनुमंत दुर्गुले (३५, रा. नांदगिरी, कोरेगाव, जि. सातारा) असे अटक आरोपींची नावे आहेत. शशिकांत वाडकर आणि नितीन उर्फ अण्णा दीक्षित (रा. वडगाव मावळ) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आदिनाथ सोसायटीच्या पार्किंग ग्राउंड समोरील सार्वजनिक रोडवर दोन जण अवैधरित्या गांजाची विक्री करत असल्याची माहिती पोलिस अंमलदार मनोजकुमार साळुंखे, मारुती पारधी यांना मिळाली होती. यानंतर सापळा रचून आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३६ किलो ८९६ ग्रॅम गांजा, ६७ हजार किमतीचे ६ मोबाईल आणि ५ लाखांची एक कार जप्त केली आहे.
आरोपी हर्षल बोरा आणि रविंद्र दुर्गुले यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा गांजा शशिकांत वाडकर आणि नितीन उर्फ अण्णा दीक्षित यांना विक्री करणार असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपींविरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, अंमलदार विशाल शिंदे, योगेश मोहिते, सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंखे, मारुती पारधी, पांडुरंग पवार, ज्ञानेश्वर घोरपडे, प्रवीण उत्तेकर आणि विशाल दळवी यांच्या पथकाने केली.