यवत : जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा दौंड तालुक्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर आज बारामतीकडे रवाना झाली. आज वासुंदे गुंजखिळा या ठिकाणी समस्त दौंड तालुक्यातील हजारोंच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाने तुकोबारायांना निरोप दिला.
या वेळी दौंड तहसीलदार अरुण शेलार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, विभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला जाधव, नायब तहसीलदार ममता देशमुख, नायब तहसीलदार तुषार बोरकर, यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा वरवंड मुक्काम आटोपून पाटसला विसावला. यानंतर पावसाळ्यातील अल्हाददायक वातावरण मुखात हरिनाम सोबतीला डोक्यावर तुळस, टाळ, मृदूंग वीणेचा गजर अशाच उत्साहपूर्ण वातावरणात विठ्ठलाच्या दर्शनातील अवघड समजला जाणारा रोटी घाट संत तुकाराम महाराजांच्या पालखीने सहज पार केला.
पंढरीच्या मार्गात सर्वात अवघड असलेल्या रोटी घाटाची नागमोडी वळणाची चढण डोळ्यासमोर ठेवून हरिनामाच्या जयघोषात वारक-यांनी वरवंड ग्रामस्थांचा निरोप घेतला. ढगाळ वातावरणामुळे सुखावलेला वारकरी अवघड घाटही आनंदाने सर केला. संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथास रोटी घाट पार करण्यासाठी 5 बैलजोड्या जुंपण्यात आल्या होत्या. विठ्ठल नामाचा जयघोष करीत वारकरी पालखी रथ ओढत होते. यामुळे अवघड टप्पा तुकोबारायांच्या पालखीने सहज पार केला. रोटी ग्रामस्थांनी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवत समाज आरती केली. पुंडलिका वर देव हारी विठ्ठल या जयघोषाने परिसर दणाणून गेला. घाटात मृदंगाच्या तालावर वारकरी नाचण्यात दंग झाले होते. यावेळी वारकऱ्यांचा आनंद शिगेला पोचला होता. सभोवतालचा हिरव्यागार शिवाराचा आनंद वारकरी घेत होते. या उत्साही वातावरणात घाटाच्या वळणावरून पालखी सोहळा हळू हळू पुढे सरकत होती.
संत ज्ञानेश्वर महराजांच्या पालखीसाठी जसा दिवे घाट कठिण टप्पा असतो. त्याच प्रमाणे रोटी घाट हा संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी कठिण टप्पा असतो. हाच कठिण टप्पा वारकऱ्यांनी हसत खेळत आणि फुगड्या घालत पार केला आहे. हा घाट निसर्ग सौदर्यांने नटलेला असून यावेळी निसर्ग तुकाराम महाराजांची वाट बघत असल्याचं चित्र दिसत होतं.
दौंड तालुक्यातील अनेक भाविक संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत रोटी घाट पार करण्यासाठी आले होते. यावेळी रोटी घाट वारकऱ्यांनी फुलून गेला होता. लाखो वारकरी टाळ, मृदुंगाच्या तालावर विठ्ठल नामाचा जयघोष करीत चालले होते. अनेक वारकऱ्यांनी भजन करीत, नाचत रोटी घाट पार केला. रोटी घाटात टाळ मृदुंगाचा आवाज आणि विठ्ठल नामाचा जयघोष घुमत होता. गवत उगवल्याने हिरव्या झालेल्या रोटी घाटात वारकऱ्यांच्या खांद्यावर डौलाने डोलणाऱ्या भगव्या पताका लक्षवेधी ठरत होत्या. त्यानंतर हिंगणी गाडा येथील नागेश्वर महाराज मंदिरातील विसाव्यानंतर जगदगुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान वासुंदे, हिंगणीगाडा मार्गे बारामतीकडे झाले.
आजचा मुक्काम गवळ्याची उंडवडी येथे होणार असून उद्या शनिवारी सकाळी बारामतीच्या दिशेने पालखी मार्गस्थ होणार आहे. दोन दिवसांचा मुक्काम आटोपून संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीला दौंड तालुक्यामधून निरोप देण्यात आला. या दोन दिवसांच्या मुक्कामामध्ये शेकडो भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करत पादुकांचे दर्शन घेतले. तालुक्यातील अनेक सामाजिक संस्था, विविध संघटना यांनी पंढरीची वारी अनुभवण्यासाठी भाविकांनी वारकऱ्यांची शक्य तेवढी मनोभावे सेवा केली.