पुणे : खरेदीसाठी किंवा फिरण्यासाठी घरातून बाहेर पडल्यानंतर गरज भासल्यास सार्वजनिक स्वच्छतागृह कुठे आहे, याचा शोध घ्यावा लागतो; पण आता शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह कुठे आहेत, याची माहिती पुणेकरांना एका ॲपवर मिळणार आहे. शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या सुविधांसह माहिती देणाऱ्या ‘टॉयलेट सेवा ॲप’चा पुढचा टप्पा महापालिकेने सुरु केला असून, या माध्यमातून आता पुणे स्वच्छ ठेवण्यासाठी मदत होणार आहे. अस्वच्छता असल्यास याविषयीचा अभिप्राय अथवा तक्रारही पुणेकरांना नोंदवता येणार आहे.
पुण्यात ठीकठिकाणी स्वच्छतागृह उभे केलेले आहेत. मात्र, अनेकांना त्याचा पत्ता माहीत नसतो. त्यामुळे हे ‘टॉयलेट सेवा’ अॅप आपल्याला स्वच्छतागृहाचा पत्ता मिळवून देते. टॉयलेट सेवा हे अॅप शहरातील विविध भागांतील स्वच्छतागृहांचा पत्ता मिळवून देते. इतकेच काय तर ते स्वच्छतागृह स्वच्छ आहे का नाही? सुस्थितीत आहे का नाही, याची माहिती देखील देते. महिलांना अनेक वेळा स्वच्छतागृह नसल्यामुळे अडचण निर्माण होते. यासाठी हे अॅप विकसित केले आहे.
केंद्र सरकारच्या २०२३ च्या ‘स्वच्छ शौचालय’ उपक्रमाअंतर्गत ‘स्वच्छ शौचालय स्पर्धा’ आयोजित करण्यासाठी हे ॲप उपयुक्त ठरणार आहे. ‘टॉयलेट सेवा ॲप’ हे शहरातील ११८३ सार्वजनिक शौचालयांची माहिती देते. ॲपवर जवळचे स्वच्छतागृह शोधण्याबरोबरच वॉश बेसिन, पाणी, लिक्विड सोप किंवा सॅनिटायझर, कचराकुंडी, लाइट, महिलांसाठीच्या सॅनिटरी नॅपकिन्स आदी सुविधा असलेल्या स्वच्छतागृहांची माहिती स्वतंत्रपणे उपलब्ध करुन दिली आहे. एक जानेवारी ते ३० जून २०२४ या कालावधीत पुणे शहरात स्वच्छ स्वच्छतागृह स्पर्धादेखील घेण्यात येणार आहे.
कसे आहे ‘टॉयलेट सेवा ॲप’?
– हे अॅप वापरकर्त्यांना अभिप्राय देण्यास आणि शौचालय सुविधा आणि स्वच्छतेबद्दल तक्रारी नोंदविण्यास अनुमती देते.
– वापरकर्ते रेटिंग देखील देऊ शकतात.
– वापरकर्ते जवळचे शौचालय शोधू शकतात आणि महिलांसाठी वॉश बेसिन, पाण्याची उपलब्धता, लिक्विड साबण किंवा सॅनिटायझर, डस्टबिन, दिवे आणि सॅनिटरी नॅपकिनची उपलब्धता यासारख्या सुविधांची माहिती मिळवू शकतात.
– सध्या दहा हजारांहून अधिक नागरिकांनी अॅप डाऊनलोड केले आहे.
– नोव्हेंबरमध्ये सर्व शौचालयांमध्ये क्यूआर कोड बसविण्यात आले, ज्यामुळे आतापर्यंत 100 फिडबॅक सबमिशन झाले.
दिले.
‘स्वच्छ शौचालय स्पर्धे’चे नियम
– ही स्पर्धा १ जानेवारी ते ३० जून २०२४ या कालावधीत होणार आहे.
– ‘टॉयलेट सेवा अॅप’ रेटिंग (३० गुण), अॅप वापर (३० गुण) आणि प्रत्यक्ष तपासणी (४० गुण) या गुणांकनावर आधारित गुणांकन केले जाणार आहे.
– प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील पहिल्या पाच स्वच्छतागृहांची शहरस्तरावर निवड करण्यात येणार असून, त्यातील सर्वोत्कृष्ट तीन शौचालयांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.
– प्रत्येक प्रभाग कार्यालय स्तरावर एक आणि केंद्रीय स्तरावर एक अशा पंधरा समित्या परीक्षा घेतील.