लोणी काळभोर, (पुणे) : बुलेटला कंपनीकडून मिळालेले सायलेन्सर बदलून फटाके फोडणारे किंवा ध्वनिप्रदूषण करणारे सायलेन्सर लावणाऱ्या वाहनचालकांवर लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी या कारवाईबाबत माहिती दिली.
वाहतूक पोलिसांनी मागील दोन दिवसांत २१ बुलेटवर कारवाई करून ३१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करत बुलेटचे सायलेन्सरही काढून घेण्यात आले आहेत. याबाबत ‘पुणे प्राईम न्यूज’ने लोणी काळभोर, उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंठामंत्र्यांच्या मुलांसह टवाळखोर ‘बुलेट राजां’च्या उनाडखोरीला चाप कधी लागणार? या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द केली होती. या बातमीची गंभीर दखल लोणी काळभोर पोलिसांच्या वाहतूक विभागाने ही कारवाई केली आहे.
दुचाकी वाहनांच्या सायलेन्सरमध्ये बदल करून फटाक्यासारखा आवाज काढण्यात येत असल्याचे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडत होते. रात्री-अपरात्री फटाक्यासारखे आवाज काढून फिरणाऱ्या बुलेटचालकांमुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारीही नागरिकांनी पोलिसांकडे तसेच ‘पुणे प्राईम न्यूज’च्या कार्यालयात येऊन केल्या होत्या. याबाबत ‘पुणे प्राईम न्यूज’ने वृत्तही प्रसिद्ध केले होते. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी बुलेट चालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे.
…अन्यथा कारवाई अटळ
आजपर्यत २१ बुलेटसह कर्कश आवाज काढणाऱ्या दुचाकींवर पोलिसांनी कारवाई केली आहे. वाहनात बदल करणे हे बेकायदेशीर असून, असा बदल दिसून आल्यास पोलिस कारवाईला सामोरे जावे लागेल, आवाज करणारे किंवा फटाके फोडणारे सायलेन्सर बदलून घ्यावेत. अन्यथा कारवाई अटळ आहे, असा इशाराही पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी दिला आहे.
व्हॉट्सॲपवरही देऊ शकता माहिती
पुणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीत फेरबदल केलेल्या सायलेन्सच्या मोटरसायकल चालवताना वाहनचालक आढळून आल्यास त्याची माहिती पुणे शहर वाहतूक शाखेच्या व्हॉटसअॅप क्रमांक 8087240400 वर वाहन क्रमांक व लोकेशनसह कळवावी. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
सायलेन्सरही घेतले काढून
लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी फटाका वाजवणाऱ्या बुलेटस्वारांविरोधात केवळ दंड वसूलीची कारवाईच केली नाही तर फटाका वाजवणारे सायलेन्सरही काढून घेत दुसरे सायलेन्सर बसवले आहेत. त्यामुळे आता काही अंशी अशाप्रकाराला चाप बसेल, अशी आशा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
आवाज वाढवणारे सायलेन्सर काढावेत
“लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व वाहन चालकांना ज्यांचे वाहनात फटाके फोडणारे सायलेन्सर किंवा कर्णकर्कश आवाज करणारे हॉर्न लावण्यात आले आहेत, अशा वाहन चालकांनी वाहनांचे सायलेन्सर व हॉर्न शासन नियमांनुसारच लावावे अन्यथा कायदेशीर कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल.”
– कुमार घाडगे, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा, लोणी काळभोर (ता. हवेली)