पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये मे महिन्यात झालेल्या भीषण पोर्श कार अपघातानंतर राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांची पोलिसांनी 4-5 तास चौकशी केल्याचा खुलासा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. त्यानंतर पवार यांनी टिंगरे यांचा या प्रकरणातील नंतरच्या घडामोडीत कोणताही सहभाग नसल्याचे ठामपणे सांगितले.
याबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेंज हिल्स येथील क्राईम ब्रँच युनिट 4 च्या कार्यालयात आमदार टिंगरे यांची चौकशी करण्यात आली. “आरोपींना संरक्षण देण्यासाठी किंवा पोलिस अधिकाऱ्यांवर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने टिंगरेचा सहभाग निश्चित झाला नाही,” असे अधिकाऱ्याने सांगितले. परंतु याबाबत अधिक तपशील देण्यास नकार दिला.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये आमदार टिंगरे यांच्याशी संबंधित दोन व्यक्ती आहेत.अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड या व्यक्तींनी ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि अल्पवयीन आरोपीचे वडील यांच्यात मध्यस्थ म्हणून काम केले. त्यांनी अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने देण्याऐवजी त्याच्या आईच्या रक्ताचे नमुने देत ते अल्कोहोलच्या प्रभावाखाली नसल्याचे खोटे दर्शविण्याची सोय केली. त्यानंतर अल्पवयीन मुलाचे पालक आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली.
पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे टिंगरे यांना तपासात हस्तक्षेप करण्याचा आणि अल्पवयीन चालकाला संरक्षण देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांना सामोरे जावे लागले, विशेषतः 19 मेच्या घटनेनंतर येरवडा पोलिस स्टेशनला भेट दिल्यानंतर. टिंगरे यांनी हे आरोप सातत्याने फेटाळून लावले आहेत.
वडगाव शेरी विधानसभा क्षेत्रातील कल्याणी नगर येथे एका 17 वर्षीय मुलाने पोर्श कार दारूच्या नशेत चालवत दोन आयटी अभियंत्यांना चिरडले होते. चालक हा एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे.