पुणे: कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपी कारचालक मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी फरारी असलेल्या अरुण सिंग (रा. विमाननगर) याचा अंतरिम जामिनाचा अर्ज मंगळवारी (दि. ५) न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे त्याला पोलिसांपुढे हजर होण्याशिवाय गत्यंतर उरलेले नाही. अपघात झाल्यानंतर मद्यधुंद कारचालक मुलाचे, तसेच त्याच्या दोघा मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. मुलाऐवजी त्याची आई शिवानी अग्रवाल हिच्या रक्ताचे नमुने ससूनच्या दोघा डॉक्टरांनी बदलले असल्याचे यापूर्वीच निष्पन्न झाले आहे. त्यानुसार शिवानी अग्रवाल, तसेच ससूनमधील डॉ. अजय तावरे व श्रीहरी हाळनोर यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
दरम्यान, या मुलासोबत असलेल्याही त्याच्या मित्रांचेही रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याची माहिती चौकशीत पुढे आली. त्यासंदर्भात गुन्हे शाखेने आदित्य अविनाश सूद (वय ५२, रा. सोपान सोसायटी, घोरपडी) व आशिष सतीश मित्तल (वय ३७, रा. स्काय वेलवेडर सोसायटी, विमाननगर) यांना अटक केली आहे. त्यांच्यासोबत रक्ताचे नमुने बदलण्यात सहभाग असलेला अरुणसिंग हा आरोपी फरारी झाला. त्याने अटकपूर्व जमीन मिळावा, यासाठी केलेला अर्ज स्थानिक न्यायालयाने व नंतर उच्च न्यायालयानेही यापूर्वी फेटाळला. त्यामुळे त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अटकपूर्व जामिनाला विरोध करण्यासाठी सरकार पक्षाने केलेला जोरकस युक्तिवाद ग्राह्य धरून या न्यायालयानेही मंगळवारी अरुणसिंग याचा अर्ज फेटाळून लावला.