पुणे: ड्रग्स तस्कर ललित पाटील प्रकरणात ससून रूग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांना सबळ पुरावे मिळाले आहेत. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांनी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या मुख्य सचिवांना प्रस्ताव पाठविला आहे. डॉ. संजीव ठाकूर यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास डाॅ. ठाकूर यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे.
ड्रग्स तस्कर ललित पाटील ससूनमधून पसार झाल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील डाॅ. संजय मरसाळे यांना गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती. यापूर्वी येरवडा कारागृहातील समुपदेशकाला देखील गुन्हे शाखेने अटक केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दोन पोलीस कर्मचारी, कारागृहातील दोन कर्मचारी, तसेच ससून रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यासह २० जणांना अटक करण्यात आली आहे. डॉ. संजीव ठाकूर यांंना पदमुक्त, तर डॉ. प्रवीण देवकाते यांना निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, कारागृहातून ससून रुग्णालयात उपचाराच्या बहाण्याने दाखल झालेला ललित पाटील २ ऑक्टोबर २०२३ रोजी पसार झाला होता. ३० सप्टेंबर रोजी ससून रुग्णालयाच्या परिसरात ललित पाटीलच्या साथीदाराकडून दोन कोटी ३२ लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते.