पुणे : शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावत आहे. वाहनांची तोडफोड, किरकोळ कारावरून गंभीर मारहाणीच्या घटना सातत्याने घडत आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अचानक पुणे पोलिसांनी गुन्हेगारांची तपासणी मोहिम राबविली. या विशेष मोहिमेअंतर्गत मध्यरात्री गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. रात्रीत, पोलिसांनी दीड हजार जणांची तपासणी केली. त्यामध्ये तब्बल सव्वासातशे गुन्हेगार आढळले. पोलिसांनी अन्य भागांतही ५४ कारवाया करून ५७ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी वाहनांची तपासणी केली.
शहरातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसविण्यासाठी त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवरच बुधवारी रात्री शहरातील गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी केलेल्या या कारवाईत दीड हजार गुन्हेगारांपैकी सव्वासातशे गुन्हेगार पोलिसांना आढळून आले. त्यासोबत बेकायदा सुरू असलेल्या जुगार अड्डे, हातभट्टी तसेच इतर बेकायदा प्रकारांवरही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी कोठे केली कारवाई?
– स्थानिक पोलिसांकडून वेगवेगळ्या भागात ३१ प्रकरणात जुगार साहित्य जप्त.
– महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार सहा तडीपार गुन्हेगारांवर कारवाई.
– गुन्हे शाखेने गावठी दारू अड्डे उद्धवस्थ करून ६ गुन्हे दाखल, २१ हजारांचा ऐवज जप्त.
– शहरातील ३८८ उपाहारगृहे, ढाबे आणि लॉजची तपासणी.
– रेल्वे स्थानक, एसटी बसेसची पाहणी.
– नाकांबदी करून संशयित १ हजार २२७ वाहनांची तपासणी करून सव्वादोन लाखांचा दंड वसूल.
– वाहतूक शाखेने ९९९ वाहनांची तपासणी करून २ लाख १२ हजारांची दंडात्मक कारवाई.