पुण्यातील (Pune) तेजश्री आयुर्वेदिक उपचार केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या महिलांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 3 फेब्रुवारी रोजी दुपारीच्या सुमारास रोहित वाघमारे आणि त्याचे दोन मित्र आयुर्वेदिक उपचार केंद्राला भेट देण्यासाठी गेले होते. तेथे महिलांचे उपचार सुरू असतांना आरोपी तिथेच थांबले दरम्यान, एका महिलेने आरोपींना बाहेर जाण्याची विनंती केली होती. याचाच राग आल्याने आरोपींनी 20,000 रुपये दिले नाहीत तर उपचाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याची धमकी दिली. पैसे देऊ न शकल्याने, पीडितांनी पोलिसांना ही बाब कळवली आणि भारतीय दंड संहितेच्या खंडणी आणि मारहाणीसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, पोलिस उपायुक्त पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गौड आणि सहकारनगर पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांच्या समर्पित पथकाच्या नेतृत्वाखाली आरोपींना अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गौड यांच्या नेतृत्वाखालील तपासादरम्यान रोहित वाघमारे (36), शुभम चांगदेव धनवटे (20) आणि यशोदीप चौधरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तपासा दरम्यान, आरोपींनी या आधीही पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी अशाच प्रकारच्या खंडणी वसूल केल्याची कबुली दिली आहे.दरम्यान, न्यायालयाने आरोपींना 12 मार्च 2025 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणाची तपासणी सुरु असून आरोपींनी केलेल्या गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या इतर संभाव्य साथीदारांचा शोध सध्या पोलिस घेत आहेत.