Pune News : पुणे : राज्यभरातीलच नव्हे तर देशभरातील भाविकांच्या औत्स्युक्याचा विषय असलेली पुण्याची गणेश विसर्जन मिरवणूक आज (ता. २९) दुपारी तीन वाजता संपली. निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही तर क्षमा असावी… असे म्हणत पुण्यातील शेवटच्या गणेश मंडळाच्या गणरायाचे विसर्जन मोठ्या उत्साहात झाले. यंदा २९०५ गणेश मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवला. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक यंदा तब्बल २८ तास ४० मिनिटे चालली. सकाळी १०.३० वाजता विसर्जन मिरवणूक सुरू झाली होती. दुपारी ३.१० वाजता मिरवणूक संपली.
मागील वर्षीच्या तुलनेत अडीच तास लवकर सांगता
यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल, ताशे, लेझिम पथक, सनई-चौघडा असा लवाजमा होता. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता मिरवणूक सुरु झाली. पुणे शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्त्यावरून मिरवणूक नेली. गुरुवारी प्रथम पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे विसर्जन झाले.(Pune News) त्यानंतर मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम, मानाचा चौथा गणपती तुळशीबाग आणि मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीचे विसर्जन झाले.
यंदा प्रथमच दगडूशेठ गणपती मंडळ दुपारी चार वाजताच मिरवणुकीत सहभागी झाले. पांचाळेश्वर मंदिर घाट येथे रात्री ८.५० वाजता दगडूशेठ गणपती मंडळाच्या गणरायाचे विसर्जन झाले. (Pune News) मंडळाने यंदा फक्त पाच तासांत गणरायाचे विसर्जन केले. मंडळाने महिन्याभरापूर्वीच दुपारी मिरवणुकीत सहभागी होणार असल्याचा निर्णय जाहीर केला होता.
यापूर्वी किती तास चालली होती मिरवणूक…
– २०१६ – २८ तास ३० मिनिटे
– २०१७- २८ तास ५ मिनिटे
– २०१८- २७ तास १५ मिनिटे
– २०१९ – २४ तास
– २०२०- २०२१- कोविडमुळे मिरवणूक नाही
– २०२२- ३१ तास
– २०२३- २८ तास ४० मिनिटे
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : विसर्जन मिरवणुकीत एक हजार मोबाईलची चोरी; पुणे पोलिसांच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंद
Pune News : …बायको माहेरी गेल्यासारखे नाचू नका; बॅनरने वेधले पुणेकरांचे लक्ष!