Pune News : पुणे : शहरात वाहनचोरीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक फॉर्च्यूनर कार चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना महागड्या चारचाकी गाड्या चोरणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा छडा लावण्यात यश आले. पोलिसांनी या गुन्ह्यात चोरीला गेलेल्या कारसह ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच वाहन चोरीचे दोन गुन्हे देखील उघडकीस आणले आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने टोळीला बेड्या ठोकण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.
गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कामगिरी
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्यात हद्दीतून फॉर्च्यूनर गाडी चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार संदीप येळे आणि अमोल सरतापे यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. (Pune News) यावरून आरोपींचा माग काढत ताब्यात घेतले. चौकशी केली असता, या गुन्ह्यामध्ये स्थानिक सराईत गुन्हेगाराचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गोरक्षनाथ साळवे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. आरोपींनी डिव्हाइसच्या मदतीने बनावट चावी तयार करुन कारची चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
मनोज महेंद्र परिहार, राजेश राधेश्याम पंडित, इस्माईल शेफरखान (सर्व रा. आग्रा, दिल्ली) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शहरामध्ये वाहन चोरी करण्यास मदत करणाऱ्या गोरक्षनाथ साहेबराव साळवे (रा. काळेवाडी फाटा, रहाटणी, पुणे) याला अटक केली आहे. (Pune News) अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर नोएडा येथे वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. साळवे हा देखील सराईत गुन्हेगार असून, त्याच्याकडून लोणीकंद आणि गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यानंतर आरोपींकडून फॉर्च्युनर आणि गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील इनोव्हा क्रिस्टा कार, तीन डोंगल, दीड लाख रुपये किंमतीचे इलेक्ट्रॉनिक्स चावी तयार करण्याचे पॅड, तीन मोबाईल, असा एकूण ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी हे डिव्हाईसच्या साह्याने प्रोग्रॅम चोरून जागीच डूप्लीकेट चावी तयार करून वाहन चोरी करत होते.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे २ सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली (Pune News)वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक पाडवी, अंमलदार उदय काळभोर, दिनकर लोखंडे, अशोक आटोळे, दत्तात्रय खरपुडे, शिवाजी जाधव, सुदेश सपकाळ, गणेश लोखंडे, विक्रांत सासवडकर, राहुल इंगळे, अमोल सरतापे, संदीप येळे, विनायक येवले यांच्या पथकाने केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : वडील-मुलीच्या नात्याला काळिमा; सख्ख्या बापाकडून मुलीचा विनयभंग; नराधमावर गुन्हा दाखल
Pune News : पीएमपीमधील गर्दीचा गैरफायदा घेऊन युवतीचा विनयभंग; एकाला अटक