Pune News : पुणे : सासूकडून पैसे उकळण्यासाठी चक्क एका भामट्याने चक्क स्वतःच्या आणि मेहुणीच्या मुलींच्या अपहरणाचा बनाव रचून १० लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरीचिंचवड शहरातून उघडकीस आला आहे. मात्र, वाकड पोलिसांनी जावयाची भामटेगिरी उघडकीस आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर आरोपीच्या ताब्यात असलेल्या मुलींची सुखरुप सुटका केली आहे.
दहा लाख रुपये मिळवण्यासाठी हा अपहरणाचा बनाव रचला
सचिन मोहिते असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सारिका कैलास ढसाळ (वय-३८, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक रोहित दिवटे आणि त्यांचे पथक मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास गस्त घालत होते. (Pune News) गस्त घालत असताना पोलिसांना रहाटणीतील कोकणे चौकात काहीजण घाईगडबडीत जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना हटकले.
यावेळी सारिका ढसाळ यांनी सांगितले कि, माझी दोन वर्षांची मुलगी आणि माझी बहीण शितल सचिन मोहीते (रा.वाघोली) हिची १५ वर्षाची मुलगीही बेपत्ता आहे. मंगळवारी (ता.२९) सायंकाळी दोघीजणी राखी खरेदी करण्यासाठी बाहेर आल्या होत्या. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्याचं त्यांनी पोलीस पथकाला सांगितलं.
त्यानंतर वाकड पोलीस आणि गुन्हे शाखेची पथकांनी मुलींचा शोध सुरू केला. पोलिसांनी कुटुंबियांची चौकशी केली असता, त्यावेळी जावाई सचिन मोहिते देखील हजर होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आपण वाघोली येथून आलो असल्याचं सचिन यानं आपल्या जबाबात सांगितलं.
पोलिसांनी चौकशी केली असता, आरोपी सचिन हा घटना घडताना कार सर्व्हिसिंगसाठी घेऊन गेल्याचे शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं. (Pune News) पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, सचिनच्या कारप्रमाणं दिसणाऱ्या कारमध्ये बसून दोन्ही मुली गेल्याचं दिसलं. त्यामुळे सचिन याच्यावर पोलिसांना संशय बळावला.
दरम्यान, ‘तुमच्या मुली सुखरूप पाहिजे असतील तर पोलिसांना काही न सांगता १० लाख रुपये द्या, नाहीतर तुमच्या मुलींचं बरेवाईट करेन’ अशी धमकी सचिनने दिली असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन झाले आहे. तसेच सचिनची कसून चौकशी केली असता, सासू पुष्पा अल्हाट यांना भीती दाखवून त्यांच्या बँकेत असणाऱ्या मालमत्तेपैकी दहा लाख रुपये मिळवण्यासाठी हा अपहरणाचा बनाव रचला असल्याची पोलिसांना कबुली दिली आहे.
पोलिसांनी सचिनला ताब्यात घेतल्यानंतर दोन्ही मुलींच्या संदर्भात चौकशी केली असता, आरोपीने मुली सकाळी दहा वाजता वाघोली येथून निघून मनपा पुणे येथे येणार आहेत. असे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मनपा पुणे येथे तीन पथकं पाठवली.(Pune News) मात्र, मुली मनपा पुणे येथे पोहोचल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांची चिंता वाढू लागली.
त्यानंतर पोलिसांनी आरोपी सचिनने मुलींना ठेवलेल्या जागी जाऊन पाहणी केली असता, तिथंही मुली मिळून आल्या नाहीत. (Pune News) त्यानंतर पोलिसांनी पीएमपीएमएल प्रशासनाशी समन्वय साधत, वाघोली ते पुणे मनपा यादरम्यानच्या बसचालक व वाहकांना संपर्क करत मुलींची माहिती घेतली. त्यानंतर दुपारी दीड वाजताच्या सुमारास मुलींना बसमधून ताब्यात घेण्यात आले. मुलींना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी सुखरूप त्यांच्या घरी सुपूर्त केल्या.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पीटी शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा केला विनयभंग
Pune News : आता पुणे रेल्वे स्थानकावर कृत्रिम प्रज्ञेची नजर..!