राजेंद्रकुमार शेळके
Pune News : मांजरी : विश्व मानक दिन दरवर्षी १४ ऑक्टोबरला साजरा केला जातो. मानकीकरणामुळे उत्पादने आणि सेवांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि सुसंगतता सुनिश्चित होण्यास मदत होते. व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना देण्यातही त्याची महत्त्वाची भूमिका असते. विश्व मानक दिन २०२३ या वर्षाची थीम “सामायिक मानक, एक जग” ही आहे. ही थीम मानक विकसित करण्यात आणि अंमलबजावणीत आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्त्व दर्शवते. तसेच सतत विकास आणि समावेशी वाढीस चालना देण्यात मानकांची भूमिकाही ते अधोरेखित करते, असे प्रतिपादन भारतीय मानक ब्यूरोचे डेप्युटी डायरेक्टर ज्ञान प्रकाश यांनी केले.
मांजरी अभियांत्रिकी महाविद्यालयात विश्व मानक दिन साजरा
मांजरी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मांजरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भारतीय मानक ब्युरो बी.आय.एस. स्टॅंडर्ड क्लबची स्थापना करण्यात आलेली आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात बीआयएस स्टँडर्ड क्लबद्वारे विश्व मानक दिन साजरा करण्यात आला. (Pune News) त्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सादरीकरणासाठी विद्यार्थ्यांना ५ हजार पाचशे रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय मानक ब्यूरोचे डेप्युटी डायरेक्टर ज्ञान प्रकाश, स्टॅंडर्ड प्रमोशन ऑफिसर हर्ष मोहन शुक्ल हे उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना ज्ञान प्रकाश यांनी बीआयएस मानकांची माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रकाश म्हणाले की, बीआयएस मानकांना जागतिक मान्यता प्राप्त आहे. ते उत्पादनांच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेची खात्री देतात. मानकीकरण काय आहे, ते का महत्त्वाचे आहे आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो, याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. (Pune News) भारतीय मानक ब्यूरोचे स्टॅंडर्ड कंसल्टंट प्रवीण शिरसाट यांनी बीआयएस मानकांच्या महत्त्वाबाबत माहिती दिली. ग्राहकांचे फसवणूकीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी भारतीय मानक ब्यूरोने वैशिष्ट्यपूर्ण मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे.
ग्राहकाने खरेदी केलेल्या वस्तूंच्या गुणवत्तेची पडताळणी या ॲपद्वारे करणे शक्य झाले आहे. वस्तूच्या गुणवत्तेबाबत थेट तक्रार करण्याची सुविधा देखील दिलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी भारतीय मानक ब्यूरोने तयार केलेले ॲप डाऊनलोड करून घ्यावे व विद्यार्थ्यांनी क्लबच्या माध्यमातून जनजागृतीचे काम मोठ्या प्रमाणावर करावे अशी अपेक्षा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. व्ही. पाटील यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात विद्यार्थिनींनी सुंदर असे मानक गीत सादर केले. त्यानंतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. त्यानंतर दुसऱ्या उपक्रमात मानकांवर गट चर्चा झाली. (Pune News) गट चर्चेत मानकांवर चर्चा करताना विद्यार्थ्यांनी खूप चांगले मुद्दे मांडले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच मानकीकरण क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते. ज्ञान प्रकाश व प्रवीण शिरसाट यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.
पारितोषिक विजेते विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
प्रथम- सागर कारेगावकर, द्वितीय- हरीश पजाई, तृतीय- अमन खान, उत्तेजनार्थ- ह्रिषीकेश रापटे, मानकांवर गट चर्चा, विशेष उल्लेख- प्राची उष्केवार
यावेळी बीआयएस मानक क्लबचे मेंटॉर, भारतीय मानक ब्युरोच्या समन्वयक, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा. अनुराधा जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या ऍक्टिव्हिटीमध्ये एकूण ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या उपक्रमाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले. कार्यक्रमप्रसंगी शिक्षक-शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : मनोज जरांगे पाटलांना पाठिंब्यासाठी पिंपरीत साखळी उपोषण