Pune News : पुणे : पुणे शहर आणि परिसरात गोकुळाष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाच्या दहीहंडी उत्सवामध्ये उत्साहाबरोबरच ध्वनीप्रदूषणाचाही उच्चांक पहायला मिळाला. यंदाच्या गोकुळाष्टमीचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा प्रथमच पुण्यातील नारायण पेठेतील गोगटे प्रशालेच्या मैदानावर तृतीयपंथी गोविंदांनी दहीहंडी फोडली. ही दहीहंडी पाहण्यास शहरातील अनेक भागांतून नागरिक आले होते. नागरिकांनी गोविंदांना प्रोत्साहन देत, मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी केली.
मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी
यंदा प्रथमच दहीहंडी उत्सवामध्ये तृतीयपंथी गोविंदांना संधी देण्यात आली होती. यामुळे गोविंदांनी समाधान व्यक्त केले. या उत्सवासाठी पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांतील १०० जणांचे चार संघ तयार करण्यात आले होते. या स्पर्धेत मंगलमुखी ट्रस्ट संघ, पिंपरी चिंचवड साक्षी, पुणे महानगरपालिका रनरागिणी, पुणे महानगरपालिका आयुशी हे चार तृतीयपंथीयांचे संघ सहभागी झाले होते.
उत्सवामध्ये सहभागी झालेल्या चारही संघांना प्रत्येकी २५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वेळी उत्सवाविषयी प्रतिक्रीया व्यक्त करताना तृतीयपंथी तन्वी भोसले म्हणाल्या की, कामामुळे आम्हाला छंद जोपासण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. मागील आठ दिवसांपासून आम्ही सर्वांनी दहीहंडीचा सराव केला. त्यामुळे आज दहीहंडी फोडू शकलो. दहीहंडी पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी आम्हाला प्रोत्साहन दिले. यामुळे आम्हाला आनंद वाटला. समाजाने आम्हाला आमची आमची कला सादर करण्याची संधी वेळोवेळी द्यावी, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे.
‘दीपस्तंभ’चे विश्वस्त आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, सामाजिक कार्यकर्त्यां शर्वरी गावंडे आणि शिवप्रताप संस्था यांच्या माध्यमातून तृतीयपंथीयांच्या दहीहंडीचे विशेष आयोजन करण्यात आले होते.