Pune News : पुणे : सावकाराकडून फसवणूक किंवा उपद्रव केल्याच्या अनेक घटना घडतात. बेकायदेशीर सावकारी रोखण्यासाठी शासनाने देखील कंबर कसली आहे. मात्र, अद्याप देखील या प्रकारांना आळा बसला नसल्याचे नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे उघडकीस आले आहे. मित्राचे साडेचौदा तोळे सोन्याचे दागिने तारण ठेवून त्याने १० लाख रुपयांचे कर्ज घेतले. पैसे परत केले असतानाही सोन्याचे दागिने परस्पर मोडून जबरदस्तीने कार घेतली. याप्रकरणी सावकाराला खडक पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, सचिन बापू इंदापूरकर (वय ४६, रा. रविकिरण बिल्डिंग, शाहू चौक) असे अटक केलेल्या सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी एका ४३ वर्षांच्या व्यावसायिकाने खडक पोलिसांकडे फिर्याद (गु. रजि. नं. २१२/२३) दिली आहे. फिर्यादीला व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी सचिन इंदापूरकर याच्याकडून दरमहा १० टक्के व्याजाने १० लाख रुपये घेतले होते. (Pune News) त्यासाठी त्यांनी मित्राचे साडेचौदा तोळे सोन्याचे दागिने तारण ठेवले होते.
आरोपीला त्यांनी वेळोवेळी रोख व ऑनलाईन असे ४ लाख ७५ हजार रुपये देऊनही तारण ठेवलेले दागिने परस्पर मोडून त्यातून ५ लाख ३९ हजार रुपये घेतले. असे १० लाख १४ हजार रुपये परत घेऊनही फिर्यादीची चारचाकी इनोव्हा कार घेऊन गेला. गाडी परत मागितली असता, त्याने मुद्दल व व्याज असे आणखी १८ लाख रुपये मागून त्यांना शिवीगाळ व धमकी दिली.
दरम्यान, फिर्यादीनी पोलिसांकडे धाव घेऊन फसवणूक केल्याची तक्रार केली. सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. (Pune News ) सावकाराकडून फसवणूक अथवा उपद्रव होत असल्यास सहकार विभाग व जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. शासनाने यासाठी हेल्पलाईन देखील सुरू केली आहे. या हेल्पलाईनचा लाभ घेऊन बेकायदेशीर सावकारी रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : लग्नाच्या आमिषाने बलात्कार; गुन्हे शाखेतील पोलिसावरच गुन्हा दाखल! पोलीस दलात खळबळ