राजेंद्रकुमार शेळके
Pune News : पुणे : नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे ऊर्फ परमपूज्य गुरुवर्य ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे आज आपल्यात नसणे, हे आमचे दुर्दैव आहे. महाराष्ट्राने आज एक गोड आवाजाचा नादब्रह्म कायमचा गमावला, असे भावोद्गार ह.भ.प. भाषा प्रभू पंकज महाराज गावडे यांनी काढले.
बाबामहाराजांनी फडाची परंपरा सांभाळली
नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे-सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी साताऱ्याच्या नामवंत गोरे-सातारकर घराण्यात झाला. त्यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आली होती. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जाते. निरुपणकार दादा महाराज सातारकर यांनी या फडाची सुरुवात केली होती.(Pune News) हरिविजय, भक्तिविजय या ग्रंथांवर ते प्रवचने करत असत. त्यांच्यानंतर त्यांचे दुसरे पुत्र अप्पा महाराज सातारकर यांनी फडाची धुरा सांभाळली. १९६२ साली अप्पा महाराजांचे निधन झाल्यावर अप्पा महाराजांचे पुतणे नीळकंठ ज्ञानेश्वरांनी अर्थात परम पूज्य बाबा महाराज सातारकरांनी फडाची परंपरा सांभाळली. आज ते कायमचे निघून गेले ही बाब अत्यंत क्लेशदायक आहे. असे पंकज महाराज गावडे यांनी सांगितले.
पंकज महाराज गावडे म्हणाले की, माझे पहिले कीर्तन माघ शुद्ध दशमी दिनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे झाले, त्यावेळी अनेकांनी ‘तुम्ही बाबा महाराज यांच्यासारखेच दिसता’ असे गौरवोद्गार काढले. अनेक प्रवचने केली त्यावेळी देखील कित्येकांनी बाबा महाराज यांना आम्ही श्रवण करत आहोत, असा अनुभव व्यक्त केला. तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विश्वस्त यांनी देखील हीच भावना जाहीरपणे व्यक्त केली. (Pune News) आमच्या दोघांमध्ये अनेकांना अनेक गोष्टींमध्ये साम्य वाटत होते. तुम्ही दिव्य होता आणि कायम दिव्यच राहाल; परंतु मी जेव्हा जेव्हा फेटा घालेन, कीर्तन, प्रवचन करेन तेव्हा तेव्हा भाविक मला कायम तुमचे स्मरण करून देतील.
गावडे पुढे म्हणाले की, मला आजही आठवते तुमचे वारीमध्ये लोणंद येथे कीर्तन श्रवण करण्यासाठी मी रेल्वे प्लॅटफॉर्मवर येऊन सर्वांत पुढे जागा धरून बसत असे आणि कीर्तन सुरू होण्याअगोदर तुमच्या राम कृष्ण हरि भजनात तल्लीन होत असे. (Pune News) त्यात कधी अंगावर रोमांच येत असे, तर कधी अलगद डोळे अश्रूंनी वाहू लागत. ही ब्रह्मानंदी टाळी तुमच्या कीर्तनात मी अनुभवली जी माझ्या जीवनाची भाग्य रेषा बनली. पांडुरंगाने विजयादशमी पर्वावर तुम्हाला त्याच्या दरबारात कीर्तन करण्यासाठीच कदाचित तुम्हाला बोलावले असेल कारण तो कीर्तनात नाचतो हे मी श्रवण केले आणि वाचले आहे.
समाजप्रबोधनाचे कार्य
डिसेंबर १९८३ पासून दरवर्षी संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. भंडारा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर आदी ठिकाणी त्यांनी कीर्तन सप्ताहांचे आयोजन केले. बाबा महाराजांनी सुमारे १५ लाख व्यक्तींना संप्रदायाची दिक्षा देऊन त्यांना व्यसनमुक्त केले. १९८३ साली त्यांनी जनसेवेसाठी श्रीचैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत ६० ते ७० हजार भाविकांना विनामूल्य वैद्यकीय सेवा तसेच औषधे पुरविण्यात येतात. महाराजांच्या पवित्र स्मृतींना माझे विनम्र अभिवादन.
|| सेवेलागी सेवक झालो ||– जगद्गुरु कृपांकित भाषाप्रभू
ह.भ.प. डॉ. पंकज महाराज गावडे, पुणे, महाराष्ट्र
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : हडपसरमध्ये धारदार शस्त्रांनी २२ वाहनांची तोडफोड; तिघांना अटक
Pune News : काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी पुणे दौऱ्यावर