Pune News : पुणे : तरुणाला वाटेत अडवून, कोयत्याचा धाक दाखवून लुबाडणार्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार बंडगार्डन रोडवरील तनिष्क ज्वेलर्स समोर सोमवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी ओंकार संजय कसाळकर (वय २०, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी रोड, विश्रांतवाडी) याला अटक केली असून, त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.
कोरेगाव पार्क पोलिसांची कामगिरी
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गाणाराम वेण्णाराम देवासी (वय ३१, रा. हॉटेल मस्त कलंदर, ताडीवाला रोड, मुळ रा. राजस्थान) यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गाणाराम देवासी हे हॉटेल हिडन पॅलेसमध्ये वेटर म्हणून काम करतात. ते नुकतेच राजस्थान येथून पुण्यात आले आहेत. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री ते हॉटेलमधील काम संपवून घरी ताडीवाला रोड येथे जात होते. (Pune News) त्यावेळी बंडगार्डन रोडवरील तनिष्क ज्वेलर्ससमोर तिघे जण मोटारसायकलवरुन आले. त्यांना धमकावत, कोयत्याचा धाक दाखवला आणि त्यांचा मोबाईल व खिशातील २ हजार रुपये जबरदस्तीने चोरुन नेले.
या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी दोघा अल्पवयीनांसह तिघांना पकडले आहे. (Pune News) सहायक पोलीस निरीक्षक लिंगाडे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.