पुणे : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्तीस असलेल्या ‘प्रोबेशन’ कालावधीत महिला आयएएस अधिकाऱ्याकडून नियम धाब्यावर बसविले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. खासगी ‘व्हीआयपी’ नंबर असलेल्या ऑडी गाडीला अंबर दिवा लावणाऱ्या व पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्या अॅण्टी चेंबर बळकवणाऱ्या ट्रेनी आयएसअधिकारी पूजा खेडकर यांच्यावर जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी अखेर कारवाई केली आहे. खेडकर यांची थेट वाशिम येथे बदली करण्यात आली आहे.
कोणत्याही आयएएस, आयपीएस अधिका-याला दोन वर्षाचा प्रोबेशनचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो. या काळात संबंधित अधिका-यांना विविध विभागांमध्ये काम करावे लागते. त्यानंतर कामाचा अनुभव आल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती केली जाते. याप्रमाणेच IAS असलेल्या डॉ. पूजा दिलीप खेडकर यांना 3 जून 2024 पासून पुण्यातील जिल्हाधिकार्यालयात परिवाक्षाधिन सहायक जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आले होते.
खेडकर यांच्याविरोधात पुण्याचे जिल्हाधिकारी असलेल्या दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहित अहवाल सादर केला होता. या अहवालात त्यांनी वरिष्ठ अधिका-याचे अॅंटी चेंबर बळकावल्यापासून ते खासगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिले असल्याचा उल्लेख करत खेडकर यांची प्रशिक्षणासाठी दुस-या जिल्ह्यात नियुक्ती करावी, तसेच त्यांच्या वडिलांची वर्तवणूक चुकीची असल्याचे देखील त्यांनी म्हटले असून या अहवालात व्हॉट्सअप चॅटचे फोटोदेखील जोडले आहेत. त्यानुसार ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडेकर यांची वाशिममध्ये बदली करण्यात आली आहे.