पुणे : सध्या पावसाने पुण्यात जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील काही ठिकाणी पूर्वमौसमी पाऊस बरसणार, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. या पावसामुळे पुणेकरांना उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाला आहे.
पुण्यामध्ये आज लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) अनुषंगाने अनेक राजकीय पक्षांनी सभांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या सभांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पावसामुळे (Pune Rain) या सभा होतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुण्यात आज शुक्रवारी (दि.10) सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यानंतर गेल्या तासाभरापासून पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आजच्या पावसामुळे पुण्यातील वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
उकाड्याने कासावीस झालेल्या पुणेकरांना अवकाळी पावसाने दिलासा दिला आहे. त्यामुळे तापलेल्या वातावरणातील दाह कमी होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला. यावेळी पुण्यातील लोक पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत. मात्र, राजकीय पक्षांना याचा फटका बसलेला दिसून येत आहे. कोंढवा परिसरात अजित पवारांची सभा होणार आहे. मात्र,पावसामुळे सभा पार पडणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबरोबरच जालना जिल्ह्यातही पाऊसाने चांगलीच हजेरी लावली आहे. काही भागात पाऊस पडत असल्यामुळे हवामान खराब झाले. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हेलिकॅाप्टर उड्डाण करून शकत नाही. त्यामुळे ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा रद्द करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरहून हेलिकॅाप्टरने जालना लोकसभा मतदार संघातील महाविकास आघीडीचे उमेदवार कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी जालना येथे जाणार होते.
काही भागात जोरदार झालेल्या पावसामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांनाही फटका बसणार असल्याचे दिसून येत आहे.