पुणे : युद्धजन्य परिस्थितीत ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशी आक्षेपार्ह पोस्ट केल्यांच्या आरोपावरून अटक केलेल्या तरुणीला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने शनिवारी दिला. तिच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत.
या तरुणीने केलेल्या पोस्टमुळे संताप व्यक्त केला जात असून, काही संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली. त्यामुळे या तरुणीला पोलिसांनी शनिवारी विशेष पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले. न्यायालयात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरुणीवर हल्ला होऊ नये; तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी आरोपी तरुणीसारखाच पेहराव केलेली अन्य एक महिला पोलिस कर्मचारी न्यायालयात हजर केली. दोघींना पाहिल्यानंतर न्यायालयाने विचारणा केली असता, महिला कर्मचाऱ्याने आपण पोलीस असल्याचे न्यायालयाला सांगितले.
न्यायालयातून रवानगी करतानाही त्याच पद्धतीने पोलिसांनी आरोपी तरुणीची रवानगी पोलीस कोठडीत केली. संशयित आरोपी आलेली तरुणी नुकतीच श्रीनगर येथे नातेवाईकांकडून जाऊन आली होती, अशी माहिती चौकशीत पुढे आली आहे. तेथे ती देशविरोधी काम करणाऱ्या यंत्रणांच्या संपर्कात आली आहे का? याबाबत तपास करण्यासाठी तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्याची पोलिसांची विनंती न्यायालयाने मान्य केली.
अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या तरुणीने पाकिस्तानी व्यक्तीशी संबंधित पोस्ट शेअर केल्याचा संशय पोलिसांना आहे. युद्धजन्य परिस्थितीत तेढ निर्माण करणारा संदेश समाजमाध्यमात प्रसारित केल्याप्रकरणी तिच्याविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तिला अटक करून शनिवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. जी. आर. डोरनपल्ले यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या तरुणीने अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असून, तिचा मोबाइल व अन्य इलेक्ट्रॉनिक साधने तांत्रिक तपासासाठी जप्त करायची आहेत. तिचे नातेवाइक श्रीनगर येथे राहतात.