न्हावरे: आलेगाव पागा (ता. शिरूर) येथील सर्वसामान्य कष्टकरी कुटुंबातील विकास सोपान अवचिते यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने सन २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्य कर निरीक्षक पदावर निवड झाली आहे. कोणत्याही मोठ्या सुविधा अथवा विशेष मार्गदर्शनाचा आधार नसतानाही जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर मिळविलेल्या या यशाबद्दल आलेगाव पागा परिसरातून अवचिते यांचे अभिनंदन होत आहे.

विकास अवचिते यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आलेगाव पागा येथे झाले.त्यानंतर त्यांनी न्हावरे येथील श्री.मल्लिकार्जुन माध्यमिक विद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे पुणे येथील वाडिया महाविद्यालयातून कला शाखेची पदवी सन २०१६ मध्ये पूर्ण केली.

पदवीचे शिक्षण घेत असतानाच विकास यांना स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण झाली. ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातून आलेल्या विकास यांच्यासमोर आर्थिक अडचणींसह अनेक आव्हाने होती. मात्र,या अडचणींना खचून न जाता त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्याचा ध्यास घेतला.

विशेष म्हणजे, कोणत्याही मोठ्या सुविधा किंवा विशेष मार्गदर्शनावर अवलंबून न राहता त्यांनी घरीच नियमितपणे आणि चिकाटीने अभ्यास सुरू ठेवला. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले. अखेर २०२५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिल्यानंतर त्यांच्या मेहनतीला यश आले आणि राज्य कर निरीक्षकपदावर निवड होण्याचे स्वप्न साकार झाले.
विकास अवचिते यांचे हे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर आलेगाव पागा परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. ‘परिस्थिती कोणतीही असो,जिद्द आणि सातत्य असेल तर यश निश्चित मिळते,’ हा संदेश अवचिते यांच्या यशातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे.







