पुणे : अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. या प्रसंगी बोलताना त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. “मनोज सरांना हात लावला तर संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल,” असा सडेतोड इशारा दिपके यांनी प्रशासनाला दिला आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनीजरांगे यांच्या उपोषणाचा आज 14 वा दिवस असतानाही सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. दिल्लीत सोनम वांगचूक यांना 26 दिवस उपाशी ठेवले होते, तसाच प्रकार इथेही करायचा आहे का, असा सवाल त्यांनी विचारला. दिपके म्हणाले की, जरांगे पाटील हे स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे, तर ग्रामीण भागातील तरुण आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लढा देत आहेत. जर सरकारने वेळेवर दर्जेदार शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या असत्या, तर आज कोणावरही उपोषणाची वेळ आली नसती असे त्यांनी म्हटले.

नुकतीच भेट घेतलेल्या प्रथमेश देशमुख या 27 वर्षांच्या तरुणाने केवळ 2.5 लाखांच्या कर्जापायी आत्महत्या केली. अशा दुर्दैवी घटना रोखण्यासाठी आणि तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठीच हे आंदोलन सुरू आहे. सत्तेत असलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतःच्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवतात, परंतु ग्रामीण भागातील मुलांकडे साध्या चांगल्या शाळाही नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

लोककल्याणाची कामे सोडून प्रशासन आंदोलकांकडे दुर्लक्ष करत आहे. समाजासाठी रात्रं-दिवस झटणाऱ्यांशी चर्चा करायला सरकारकडे वेळ नाही, पण विनोदवीरांना बोलावून त्यांचा पाहुणचार केला जातो, असा खोचक टोलाही दिपके यांनी सरकारला लगावला







