पुणे: पुणे विभागात अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील सैराट बिर्याणी, सातारा जिल्ह्यातील मलकापूर येथील हॉटेल शाही आणि लोणावळ्यातील साबेर रेस्टॉरंट या तीन आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाने १० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, संबंधित हॉटेल आणि रेस्टॉरंटची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा तसेच स्वच्छतेसंदर्भातील निर्धारित नियमांचे योग्य प्रकारे पालन होत नसल्याचे आढळून आले. त्यानंतर प्रशासनाने संबंधित आस्थापनांविरोधात कारवाई करत त्यांचे परवाने निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार अन्न व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांना स्वच्छतेची योग्य व्यवस्था ठेवणे, अन्नपदार्थ सुरक्षित पद्धतीने हाताळणे तसेच अन्न सुरक्षेशी संबंधित प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, यासाठी या नियमांचे पालन आवश्यक आहे. मात्र, तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने तीनही आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.

सणासुदीच्या काळात हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर अन्न व्यवसायांमध्ये ग्राहकांची संख्या वाढते. त्यामुळे अन्नपदार्थांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर सर्व अन्न व्यवसायिकांनी स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही तपासणी करून आवश्यकतेनुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.







