मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महिलांच्या बँक खात्यात सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा सन्मान निधी जमा केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे 1 कोटी 66 लाख महिलांना या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे. टप्प्याटप्प्याने पुढील 2 दिवसांत पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनाही आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना 5000 रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता लाडक्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
दरम्यान, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 रुपये खात्यात जमा होतील, अशी अपेक्षा अनेक महिलांना होती. मात्र, सध्या केवळ सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये दिले जात आहेत. त्यामुळे ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार, असा प्रश्न लाभार्थी महिलांकडून उपस्थित केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये नोव्हेंबरच्या अखेरीस म्हणजेच 25 ते 28 नोव्हेंबरदरम्यान जमा होऊ शकतात.

लाभार्थी महिलांना बँकेशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकावर आलेले संदेश तपासता येतील. तसेच UPI ॲपमधील ‘Check Bank Balance’ पर्यायातून खात्यातील शिल्लक पाहता येईल.

याशिवाय ‘नारी शक्ती दूत’ किंवा अधिकृत ॲपमध्ये लॉगिन करून अर्जाची स्थिती आणि पेमेंट स्टेटस तपासता येईल. PFMS च्या अधिकृत वेबसाइटवरही पेमेंटची माहिती मिळू शकते. त्यासाठी pfms.nic.in या वेबसाइटवरील ‘Know Your Payments’ पर्याय वापरता येईल.







