पुणे : मुंबई-बंगळुरू पश्चिम बाह्यवळण मार्गावरील चांदणी चौक ते वारजे सेवा रस्त्यावर दोन दुचाकींच्या धडकेत २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून निघून गेल्याचे समोर आले. परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे अपघाताचा उलगडा करत कोथरूड पोलिसांनी १८ वर्षीय दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पारस सुधीर बोत्रे (वय २८, रा. श्री शिवछत्रपती सोसायटी, नवी पेठ) असे मृत तरुणाचे नाव आहे. आर्यन गौरव कऱ्हाडकर (वय १८, रा. कुंबरे हर्मिटेज, डीपी रस्ता, कोथरूड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ ऑक्टोबर रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास चांदणी चौक ते वारजे सेवा रस्त्यावरील एलिटास सोसायटीजवळ हा अपघात झाला.

पारस बोत्रे हे आपल्या मैत्रिणीसोबत दुचाकीवरून चांदणी चौकातून वारजेकडे जात होते. त्याचवेळी समोरून भरधाव वेगात आलेल्या आर्यन कऱ्हाडकर याच्या दुचाकीने बोत्रे यांच्या दुचाकीला धडक दिल्याचा आरोप आहे.

या धडकेत पारस यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या नाकातून आणि तोंडातून रक्तस्राव होऊन ते बेशुद्ध पडले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अपघातानंतर संबंधित दुचाकीस्वार घटनास्थळावरून निघून गेल्याचे सांगण्यात आले. यानंतर कोथरूड पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यातून आर्यन कऱ्हाडकर याच्या दुचाकीची पारस बोत्रे यांच्या दुचाकीला धडक बसल्याचे समोर आले.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कल्पना मेडाबलमेवार यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी १८ वर्षीय दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.






