बारामती : बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या ४६ वर्षीय रुग्णाचा उंचावरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वॉर्डमधील खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना रुग्णाचा तोल गेल्याने तो खाली पडल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. रणजीत दत्तात्रय शितोळे असे मृत रुग्णाचे नाव आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षा आणि रुग्णांच्या देखरेखीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, रणजीत दत्तात्रय शितोळे हे दीर्घकालीन मद्याच्या व्यसनाने त्रस्त होते. त्यांना ४ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ५८ मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
दाखल करताना त्यांना रक्ताच्या उलट्या आणि फिट्स आल्याची माहिती नातेवाईकांनी डॉक्टरांना दिली होती. त्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मेंदूचा सीटी स्कॅन करण्यात आला. तसेच मानसोपचारतज्ज्ञ आणि ईएनटी तज्ज्ञांचाही सल्ला घेण्यात आला होता.

रुग्णाची प्रकृती अस्वस्थ असल्याने नातेवाईकांना वारंवार माहिती देण्यात आली होती. रुग्णाजवळ नातेवाईकांनी थांबावे, अशा सूचनाही रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आल्या होत्या. मात्र, नातेवाईक रुग्णालयातून निघून गेल्याचे प्रशासनाने सांगितले.

५ नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास रणजीत शितोळे यांनी वॉर्डमधील पॅसेजच्या खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नर्सिंग कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा तोल गेल्याने ते खाली पडले.
घटनेची माहिती मिळताच रुग्णाचा शोध घेण्यात आला. ते गंभीर जखमी अवस्थेत आढळल्यानंतर त्यांना तातडीने कॅज्युअल्टी विभागात हलवण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी रुग्णालयात एमएलसी (मेडिको लीगल केस) नोंद करण्यात आली असून, पोलिसांनाही माहिती देण्यात आली आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे.
दरम्यान, रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था, खिडक्यांची सुरक्षितता आणि रुग्णाच्या देखरेखीबाबत आता चौकशी होणार का, याकडे लक्ष लागले आहे.







